मुंबई - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यास सरकारची नाचक्की होईल, अशी भीती व्यक्त महाविकास आघाडीतील घटक पक्ष करत आहेत. काँगेसच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील यावरून दोन मत प्रवाह निर्माण झाल्याने दिसून आले. त्यामुळे काँग्रेस सध्या दोलायमान स्थितीत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने राज्यातील स्थितीबाबत अहवाल मागवला होता. कॅबिनेटच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची आज बैठक झाली. एकत्र बसून आमची भूमिका बैठकीत मांडली, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
लेटरबॉम्ब खळबळ-
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मुंबई ते दिल्ली पर्यंत बैठकीचे सत्र सुरू झालेले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत असून सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर मोठ्याप्रमाणात आरोप होताना दिसत आहेत. विरोधी पक्ष या सर्व प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मागत आहे.
बैठकीला हे नेते उपस्थित-
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, मंत्री सुनील केदार, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँगेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चारणसिंग सप्रा, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आदी नेते सहभागी झाले होते.
हेही वाचा- मनसुख हिरेन हत्या प्रकरणात वाझेंचा सहभाग; एटीएसची महत्त्वाची माहिती