राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जयपूरच्या सभेत हिंदुत्वावर भष्य केले त्याचा आढावा घेत त्यांनी घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे स्पष्ट केले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हणले आहे की,कधी काळी देशात मुसलमान , दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे.
भाजप त्याचेच 'खात' आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले; पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे!
भारत हा हिंदूंचा देश असल्याचे फटाके राहुल गांधी यांनी जयपूरच्या भूमीवर फोडले आहेत. जयपुरात काँग्रेसने महागाईविरोधात मोठा मेळावा घेतला. या मेळाव्यास सोनिया गांधी, राहुल व प्रियंका गांधी उपस्थित होत्या. गर्दीही चांगली होती. राजस्थानात गेल्या काही काळापासून राजकीय अस्थिरतेचे वारे वाहत होते. पंजाबनंतर राजस्थानातही बदल केले जातील असे चित्र होते. पण जयपूरच्या महागाईविरोधी रॅलीनंतर राजस्थानात मुख्यमंत्री बदल होईल असे दिसत नाही. संपूर्ण गांधी परिवार जयपुरात हजर झाला व 2024 च्या प्रचाराची दिशा त्यांनी जयपुरातूनच ठरवली. राहुल गांधी यांनी महागाईचे खापर हिंदुत्वावर फोडले. गांधी म्हणतात, ''हा हिंदूंचा देश आहे. हिंदुत्ववाद्यांचा नाही आणि आज या देशात महागाई असेल तर हे काम हिंदुत्ववाद्यांनी केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही स्थितीत सत्ता हवी आहे. त्यांना सत्याशी काही देणेघेणे नाही. सन 2014 पासून देशात हिंदुत्ववाद्यांचे राज्य आहे, हिंदूंचे नाही. आणि आपल्याला हिंदुत्ववाद्यांना घालवायचे आहे आणि पुन्हा हिंदू राजवट आणायची आहे,'' असा महनीय विचार श्री. गांधी यांनी मांडला आहे. हिंदू आणि हिंदुत्व याबाबत त्यांनी शब्दच्छल केला आहे. तरीही देशातील बहुसंख्याक हिंदू समाजाला साद घालण्याची भूमिका अनेक वर्षांनंतर काँग्रेसने घेतली. निधर्मीवाद म्हणजे फालतू सेक्युलरवादाच्या फंदात व छंदात अडकून पडलेल्या काँग्रेसला राहुल गांधींनी नवा मार्ग दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसची आजची अवस्था गावातल्या जमीनदारी गेलेल्या पडक्या भग्न वाडय़ासारखी झाली असल्याचे विश्लेषण शरद पवारांसारख्या नेत्यांनी केले, तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. मुस्लिम व दलित मतांची घसघशीत रोकडा पेढी हेच त्या जमीनदारीचे फळ होते. याच मुसलमान - दलितांच्या 'रोकडा'मुळे काँग्रेसचा वाडा चिरेबंदी तसेच वैभवशाली वाटत होता. आज ही दोन्ही खणखणीत नाणी काँग्रेसच्या मुठीतून सुटली व उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र, प. बंगालसारख्या मोठय़ा राज्यांतून काँग्रेसची घसरण झाली. मुंबई-महाराष्ट्रातला मुसलमान बिनधास्तपणे शिवसेनेला मतदान करतो. मुस्लिमांचे मतांसाठी फालतू लांगूलचालन न करणाऱ्या शिवसेनेला मुस्लिम समाजाने आपले मानावे हा काँग्रेससारख्या 'सेक्युलर' पक्षासाठी आहे.
चिंतनाचा विषय
सेक्युलरवाद म्हणजे हिंदूंना लाथा व मुसलमानांचे ऊठसूट लांगूलचालन ही भूमिका योग्य नसून हा देश सगळय़ांचा आहे. या देशाचा धर्म हिंदू आहे, पण येथे सर्व धर्म गुण्यागोविंदाने देशाचे नागरिक म्हणून राहू शकतात. मातृभूमीला वंदन करणारा, देशासाठी त्यागास तत्पर असलेला मुसलमान हा भारतमातेचाच पुत्र आहे हा विचार म्हणजेच राष्ट्रवाद आणि निधर्मीवाद. शिवसेनेने हिंदुत्व म्हणून याच विचारांची कास धरली. ''महागाई वाढली आहे, जगणे मुश्किल झाले आहे, काहीतरी करा,'' असे जनता सांगते तेव्हा ''महागाई वाढलीय. काळजी करू नका, राममंदिराची उभारणी झालीच आहे. आता मथुरेतील मंदिरांचे काम सुरू करतो,'' अशी उत्तरे देणे हिंदू संस्कृतीत बसत नाही. सध्याची दिल्लीतील राजवट ही हिंदू संस्कृतीशी मेळ खात नाहीच, पण उद्धव ठाकरे ठणकावून सांगतात त्याप्रमाणे धोकादायक असे नकली हिंदुत्व ठासून भरलेली ती बुजगावणी आहेत. कोणी काय व कसे खायचे यावर दंगली घडवून झुंड बळी घेणे हिंदू संस्कृतीत बसत नाही. हे खरे असले तरी अन्न, वस्त्र, निवारा हे राज्यकर्त्यांचे आद्य कर्तव्यच आहे. जात, धर्म न पाहता प्रजेला हे सर्व पुरविणारा राजा हाच हिंदू संस्कृतीचा पाईक ठरतो. हिंदू संस्कृती ही सहिष्णू आहे, पण षंढ नाही, हा विचार बाळासाहेब ठाकरे यांनी रुजविला व लोळागोळा पडलेला हिंदू समाज जागृत झाला. 1947 साली धर्माच्या नावावर हिंदुस्थानची फाळणी झाली. मुसलमानांसाठी त्यांचे हक्काचे पाकिस्तान निर्माण झाले. तेव्हा राहिलेला देश हा हिंदूंचाच आणि हिंदूंसाठी, असे मानले तर काय चुकले? पण पहिल्यापासून निधर्मीवादाच्या नावाखाली हिंदूंना सावत्रपणाचीच वागणूक त्यांच्या देशात मिळाली. हिंदूंना त्यांचे न्याय्य हक्कही नाकारले गेले. शंकराचार्यांपेक्षा जामा मशिदीच्या इमामांशी सलगी करण्यातच सेक्युलरवाद्यांना धन्य धन्य वाटू लागले. रामापेक्षा बाबरभक्तीत राज्यकर्ते लीन झाल्यावर लोकांच्या असंतोषाचा भडका उडाला व काँग्रेस त्यात होरपळून निघाली. हे सत्य नाकारता येत नाही. शाहबानो प्रकरणात काँग्रेसने पीडित मुसलमान महिलेचा हक्क डावलला व शरियतमध्ये न्यायालयाने ढवळाढवळ केली हे मान्य करून केली.
घटनादुरुस्ती
हे काही लोकांना पटले नाही, पण मोदी सरकारने बिनधास्तपणे तीन तलाक विरोधी कायदा करून पीडित मुसलमान महिलांना दिलासा दिला. असे धाडसी निर्णय घेताना हिंदू किंवा मुसलमान पाहायचे नसते. धर्माच्या वर देश आहे. सक्तीचे कुटुंब नियोजन, समान नागरी कायदा हे आता राष्ट्रहिताचे व राष्ट्रवादाचेच विषय बनले आहेत. त्यावर भूमिका घ्यावीच लागेल. महात्मा गांधी हे हिंदू संस्कृतीचे रक्षक होते. त्यांनी जागोजाग मंदिरांचीच उभारणी केली. त्यात त्यांना धार्मिक अध्यात्मवाद दिसला. लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध जनजागृती करण्यासाठी धार्मिक उत्सव साजरे केले. शिवजयंती व गणपती उत्सव त्यांनी घरांतून सार्वजनिक जागी आणले. देशातील हिंदूंना डावलून कोणताही लढा निर्माण करता येणार नाही व पुढे नेता येणार नाही हे काँग्रेसच्या पूर्वजांनी जाणले होते. पण स्वातंत्र्यानंतर फालतू निधर्मीवादाचा जन्म झाला व हिंदूंना आपल्याच देशात असहाय्य वाटू लागले. हिंदू समाजाच्या मनात काँग्रेसविषयी एक अढी निर्माण झाली. काँग्रेसला फक्त मुसलमान आणि ख्रिश्चनांचेच पडले आहे. अल्पसंख्याकांचे चोचले पुरवणे हेच काँग्रेसचे धोरण आहे, असा समज लोकांत आजही घट्ट रुजला आहे. तो दूर करावा लागेल. उत्तर प्रदेशसारख्या बलाढय़ राज्यांत प्रियंका गांधी यांनी एक नवा डाव टाकला आहे, पण येथील मुसलमान व दलित अखिलेश यादव, मायावतींना साथ देतो तर उच्चवर्णीय भाजपच्या हिंदुत्ववादाच्या थाळय़ा वाजवतो ही वस्तुस्थिती आहेच. कधी काळी देशात मुसलमान, दलित व्होट बँकेचे राजकारण होते व हिंदूंच्या मनात नाकारले जात असल्याची भावना तीव्र होती. आज हिंदू व्होट बँकेचे राजकारण यशस्वी झाले आहे. भाजप त्याचेच 'खात' आहे. अशा परिस्थितीत विचारांची वीज कोसळावी तसे राहुल गांधींनी हिंदू राज्य आणण्याचा बार उडवला आहे. गांधी हिंदू तर गोडसे हिंदुत्ववादी अशी फोड करून त्यांनी चर्चा सुरू केली. हिंदू म्हणजे सत्य व हिंदुत्व म्हणजे सत्ता असे ते म्हणाले; पण देश हिंदूंचा आहे हा विचार त्यांनी पुन्हा घासून पुसून वर आणला आहे. घासलेला हा दिवा त्यांना पेटविता आला तर स्वागतच आहे!