मुंबई - राज्यातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा राज्य सरकारवर विश्वास नाही. राज्य सरकारचा सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात प्रशासकीय अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहिती देत असतील तर ते राज्य सरकारचे अपयश आहे, असा टोला विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
हेही वाचा - बोरी नदीला पूर आल्याने सात्री गावाचा संपर्क तुटला, उपचाराअभावी चिमुकल्या आरुषीचा जीव गेला
- राज्य सरकारच्या चुकीच्या कामांना प्रशासकीय अधिकारी पाठिंबा देत नाहीत - दरेकर
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या कामांना पाहूनच प्रशासकीय अधिकारी त्यांना योग्य ती माहिती देत असतील. राज्य सरकारच्या चुकीच्या कामांना प्रशासकीय अधिकारी पाठिंबा देत नाहीत. राज्याच्या विकासाच्या कामांना प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री त्रस्त झाले आहेत, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. आयपीएस आणि आयएएस अधिकारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात, त्यानंतर आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर आरोप केले जातात, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. यावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांना प्रतिप्रश्न केला आहे.
- नवाब मलिक यांचे फडणवीसांवर गंभीर आरोप -
भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडीमधील मंत्र्यांवर बेछूट आरोप केले जात आहेत. हे आरोप करण्याआधी काही आयपीएस आणि आयएएस अधिकारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. त्यानंतर संबंधित मंत्र्यांवर कारवाई सुरू होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपकडून केंद्रात असलेल्या सत्तेचा गैरवापर करून, काही आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कट कारस्थान करून आघाडी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी नवाब मलिक म्हणाले होते.
हेही वाचा - आयएएस-आयपीएस अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात, त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात!