मुंबई - महाराष्ट्र पोलीस खात्यातील ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा सीबीआयकडून जबाब घेण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात ही चौकशी झाल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून कळत आहे. 21 एप्रिल रोजी रश्मी शुक्ला यांचा जबाब घेण्यात आला आहे
काय आहे प्रकरण -
रश्मी शुक्ला या राज्य गुप्तवार्ता पथकाच्या प्रमुख असताना राज्यातील काही मंत्री व सनदी अधिकाऱ्यांचे फोन टॅप करून या प्रकरणाचा त्यांनी एक अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांना पाठवला होता. हा अत्यंत गोपनीय अहवाल असूनही तो विरोधकांकडून माध्यमांसमोर आणण्यात आलेला होता. महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी हे क्रीम पोस्टिंगसाठी वशिलेबाजी करत असून एक मोठे रॅकेट सध्या राज्यात क्रीम पोस्टिंगसाठी काम करत असल्याचे यात म्हणण्यात आले होते.
सायबर पोलिसांचे शुक्लांना पुन्हा समन्स
फोन टॅपिंग प्रकरण गोपनीय अहवाल उघड करण्याप्रकरणी 26 एप्रिल रोजी मुंबईच्या सायबर पोलिसांच्या विभागाकडून डॉक्टर रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, रश्मी शुक्ला यांनी सायबर विभागाला पत्र लिहून चौकशीसाठी स्वतः हजर होऊ शकत नसल्याचे सांगितले होते. कारण देताना त्यांनी सध्या कोरोना संक्रमण वाढलेले असल्यामुळे प्रत्यक्षरीत्या चौकशीसाठी येणे शक्य नसून सायबर विभागाकडून त्यांना मेलवर प्रश्न पाठवण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली होती. रश्मी शुकला या सध्या हैदराबाद येथे सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून काम करत आहेत. सायबर पोलिसांकडून यासंदर्भात डॉक्टर रश्मी शुक्ला यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला असून 3 मेपर्यंत त्यांना सायबर विभागाच्या कार्यालयात येऊन चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.