मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर झाला. यात मराठी भाषा विषयात तब्बल १८ हजार ९७८ विद्यार्थी नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. तर इंग्रजी या विषयात बारावीत दीड लाखाच्या जवळ म्हणजेच १ लाख ४७ हजार ८७३ विद्यार्थी नापास झाले आहेत.
राज्य शिक्षण मंडळाच्या आज जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून एकुण १४ लाख १३ हजार विद्यार्थी बसले होते त्यापैकी १२ लाख 81 हजार 712 उत्तीर्ण झाले असून एकुण निकाल 90.66 लागला आहे. तर तब्बल १ लाख ३१ हजार ९७५ विद्यार्थी नापास झाले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे इंग्रजी विषयाचे असल्याचेही समोर आले आहे.
हेही वाचा - कोकणची पोरं हुशार..! विभाग पुन्हा एकदा राज्यात अव्वल
इंग्रजीच्या विषयासाठी राज्यभरात १४ लाख ८५ हजार ६८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु परीक्षेला प्रत्यक्षात १४ लाख ७३ हजार ५२३ विद्यार्थी बसले तर नोंदणी करून परीक्षेला १२ हजार १६४ विद्यार्थी हे गैरहजर राहिले असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मराठी भाषेत ८ लाख ४३ हजार ५५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ लाख ५३ हजार ९७० विद्यार्थी परीक्षेला बसले आणि उर्वरित ७ हजार ५८२ विद्यार्थ्यांनी या पेपरला दांडी मारली. तर एकुण विद्यार्थ्यांपैकी १८ हजार ९७८ विद्यार्थी हे नापास झाले आहेत. मराठी भाषा विषयाचा एकुण निकाल हा हिंदीपेक्षा कमी असून तो ९७.५६ टक्के इतका आहे. तर हिंदीचा एकुण निकाल हा ९८.०८ टक्के इतका आहे. तर हिंदीत केवळ ७ हजार ६३९ विद्यार्थी नापास झाले आहेत तर परीक्षेला दांडी मारणाऱ्याचे प्रमाण हे ३ हजार ८१४ इतके आहे.