मुंबई - कोरोना विषाणूच्या नवीन स्ट्रेनच्या बातम्या आल्यानंतर खबरदारी म्हणून राज्य सरकारने महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हॉटेल सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी
राज्य सरकारच्या या निर्णयावर हॉटेल व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हॉटेल सुरू ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठा व्यवसाय असतो. मात्र, या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार असल्याचे हॉटेल व्यावसायिक आणि आहार संघटनेचे पदाधिकारी अनु शेट्टी यांनी सांगितले.
आता कुठे व्यवसाय रुळावर
राज्य सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्रीच्या 11 वाजेपासून ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही 11 ची वेळ दीड वाजेपर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गेली 8 महिने आमचे हॉटेल बंद होते. आता कुठे व्यवसाय रुळावर येईला लागला होता. मात्र, या निर्णयामुळे पुन्हा नुकसान होणार आहे. आताच्या महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या निर्णयाने हॉटेल व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प होणार आहे. कारण 25 ते 31 हा कमवण्यासाठी महत्त्वाचा काळ आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होईल. अजूनही आम्हाला आशा आहे की सरकार काही नियमात शिथिलता आणेल, असेही शेट्टी यांनी सांगितले.
हेही वाचा -'विधानपरिषदेच्या मोहापोटी राजू शेट्टी यांच्याकडून अडत्यांसह व्यापाऱ्यांची दलाली'