मुंबई : बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण असलेल्या भायखळा येथील राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयात मुंबई महापालिकेकडून प्राण्यांसाठी पाच हजार चौरस फूट जागेत रुग्णालय उभारले जात आहे. या रुग्णालयात प्राण्यांसाठी खास अतिदक्षता विभागही असेल. सध्या या रुग्णालयाचे काम सुरु असून यात प्राण्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. वर्षभरात हे रुग्णालय कार्यरत होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
पाच हजार चौरस फुटांचे रुग्णालय
राणीबागेत अनेक पक्षी, प्राणी आहेत. यापैकी लहान प्राण्यांसाठी तसेच पक्ष्यांसाठी रुग्णालय उपलब्ध आहे. पेंग्विन पक्षी दाखल झाल्यानंतर राणी बागेत पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सध्या राणीबागेत वाघ, बिबट्या दाखल झाला आहे. तर, येत्या काही महिन्यांत इतर काही प्राणी दाखल होणार आहेत. यात परदेशातून कांगारू, झेब्रा, जिराफ असे प्राणी तर देशाच्या इतर भागातून सिंहासह इतर प्राणी आणण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्राण्यांसाठी रुग्णालय तयार केले जात आहे. पाच हजार चौरस फुटांचे रुग्णालय बांधले जात आहे. सध्या या रुग्णालयाचे काम सुरु असून यात प्राण्यांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. या रुग्णालयात प्राण्यांसाठी आयसीयूसारखी सुविधा यात असणार आहे.
विलगीकरण कक्ष उभारणार
पक्षी, इतर प्राण्यांचे विलगीकरण कक्ष, माकड प्रदर्शन सुविधा, मगर सुसर यांची प्रदर्शनी बांधण्यात येत आहे. तसेच रात्रीची निवासस्थाने बांधली जाणार आहेत. येथील पाणी कायम स्वच्छ राहिल अशी यंत्रणा तयार तयार केली जात आहे. यासाठी पालिका ६० कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करत आहे. प्राणी संग्रहालयाभोवती आवश्यक भिंती आणि काटेरी तारेचे कुंपणही बांधले जाणार आहे. मगर सुसर असे प्राणी पाण्याखाली पोहताना पाहण्यासाठी पारदर्शक गॅलरीही उभारली जाणार असल्याचे सांगण्यात आले.