मुंबई - दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना संक्रमण शिबिरात हलवण्याच्या प्रक्रियेला म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने सुरूवात केली आहे. त्यानुसार 21 अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना यासाठीच्या नोटीस पाठवण्यात आले आहेत. या नोटिसानुसार जे इमारत रिकाम्या करण्यास नकार देतील त्यांना जबरदस्तीने पोलीस बळाचा वापर करत बाहेर काढू, असा इशारा आता दुरुस्ती मंडळाने दिला आहे.
247 रहिवाशांना नोटिसा
दरवर्षी प्रमाणे दुरुस्ती मंडळाने अतिधोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध केली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षी आणि यंदाही यादी विलंबाने प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे रहिवाशांना स्थलांतरीत करण्याची प्रक्रियाही विलंबाने सुरू झाली आहे. दरम्यान 21 अतिधोकायदाक इमारतीत 717 निवासी असून यातील 247 रहिवाशांना मंडळाकडून स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार मंडळाने नुकतेच या रहिवाशांना यासंबंधीच्या नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे. तर काल (बुधवारी) सभापती विनोद घोसाळकर आणि डोंगरे यांनी या रहिवाशांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी काही रहिवाशांनी स्थलांतरणास होकार दिला आहे, तर काहींनी नकार दिल्याची माहिती डोंगरे यांनी दिली आहे.
निष्कासनाची कारवाई?
पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यात जीवित आणि वित्तहानी होत आहे. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यासाठी मंडळाने कंबर कसली आहे. आता नोटिसा पाठवल्या असून लवकरच त्यांना येथुन हलवण्यात येणार आहे. जर कुणी याला विरोध केला तर निष्कासनाची कारवाई करण्यात येणार आहे. गरज पडल्यास वीज-पाणी तोडणे वा पोलीस बळाचा वापर करणे, यासारखी कारवाई करण्यात येणार असल्याचेही डोंगरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -नकारात्मक चर्चा झाली तर काय होईल हे सांगायची गरज नाही- खा. संभाजीराजे छत्रपती