मुंबई - मुंबईत काल रात्रीपासून पाऊस पडत होता. पहाटेपासून पावसाने जोर पकडल्याने मुंबईची तुंबई झाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. त्यातच हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्याने मुंबईकर चिंतेत होते. मात्र, सायंकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा - Mumbai Rains : पावसाचा मेल-एक्स्प्रेसला फटका; मुंबईतून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
- तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असती -
मुंबईत ८ ते ११ जून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. काल सकाळी पाऊस पडल्यावर पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र काल रात्रीपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. पहाटेच्या सुमारास पावसाने जोर धरला. यामुळे हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी सर्वच सखल भागात पाणी साचले. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर झाला. चुनाभट्टी सायन येथे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. यामुळे मुंबईकरांचे हाल झाले. पाण्यातून वाट काढत अनेकांना आपले घर आणि कार्यालय गाठावे लागले. तर अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने त्यांच्या सामानाचे नुकसान झाले. एकीकडे पाणी साचल्याने नागरिक त्रस्त झाले असताना हवामान विभागाकडून रेड अलर्ट घोषित करण्यात आला. समुद्रालाही 4 मिटरहून मोठी भरती होती. यामुळे मुंबईत सतत पाऊस पडत असता तर पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असती.
- मुंबईकरांना दिलासा -
मुंबईकरांमध्ये पावसाची आणि साचलेल्या पाण्याची भीती निर्माण झाली असतानाच सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. समुद्रात ओहोटी सुरू झाल्याने शहरात साचलेले पाणी समुद्रात सोडण्यास सुरुवात करण्यात आले. यामुळे अनेक सखल भागातील साचलेले पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. साचलेले पाणी कमी होत असल्याने मुंबईकरांनी निश्वास टाकला. पावसाचे पाणी कमी होण्यास सुरुवात होताच अनेकांनी आपले घर गाठण्यास सुरुवात केली आहे. रास्तवरील पाणी कमी होत असल्याने हळूहळू वाहतूक सुरू केली जात आहे. तर रुळावरील पाणी ओसरताच रेल्वे सेवाही सुरू केली जाईल.
- इतका पडला पाऊस -
मुंबई सकाळी 5 ते सायंकाळी 5 या 12 तासात शहर विभागात 137.82 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 190.78 मिलिमीटर तर पूर्व उपनगरात 214.44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
- चार दिवस यलो अलर्ट -
मुंबईत आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. आज पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली. उद्यपासून 4 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा - VIDEO : मिठी नदी ओव्हरफ्लो; इमारतींमध्ये शिरलं पाणी