मुंबई - महापालिकेकडून १४ दिवसात धारावीजवळ निसर्ग उद्यानात २०० खाटांचे कोविड आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व २०० बेड' हे 'ऑक्सीजन बेड' मध्ये रूपांतरित करा असे आदेश आरोग्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
धारावी व महाराष्ट्र नेचर पार्क जवळच्या जागेत महापालिकेद्वारे नव्यानेच उभारण्यात आलेल्या २०० खाटांच्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राची पाहणी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केली. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल उपस्थित होते.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य केंद्रातील सेवा सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. या आरोग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत होऊन दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या ठिकाणी असणाऱ्या सर्व खाटांना 'ऑक्सीजन बेड'मध्ये रूपांतरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सदर कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात आली असून हे केंद्र उद्यापासून रुग्ण सेवेत रुजू होईल, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
१४ दिवसात उभारले केंद्र
महापालिकेच्या जी उत्तर विभागाची गरज लक्षात घेऊन या विभाग क्षेत्रातील 'महाराष्ट्र नेचर पार्क' आणि 'बेस्ट बस डेपो' लगतच्या एका जागेत २०० खाटांचे 'समर्पित कोविड आरोग्य केंद्र' उभारण्याचे काम १८ मे रोजी सुरू करण्यात आले. त्यानंतर साधारणपणे केवळ १४ दिवसात हे आरोग्य केंद्र उभारण्यात आले. तेथे आवश्यक त्या आरोग्यविषयक सोयीसुविधा देखील कार्यान्वित करण्यात आल्या. सुरुवातीला या ठिकाणी १०० 'ऑक्सीजन बेड' व १०० सामान्य खाटा; याप्रमाणे एकूण २०० खाटांची सुविधा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या अनुषंगाने आरोग्य केंद्रातील सर्व २०० 'बेड' हे 'ऑक्सीजन बेड'मध्ये रूपांतरित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता या आरोग्य केंद्रातील सर्व खाटा या 'ऑक्सीजन बेड' मध्ये रूपांतरित करण्यात येत असून ही कार्यवाही उद्यापर्यंत पूर्ण होईल, अशीही माहिती दिघावकर यांनी दिली.
किती कर्मचारी असतील
या आरोग्य केंद्रात ३ पाळ्यांमध्ये १० डॉक्टर्स, १५ नर्स, ३० वॉर्डबॉय कार्यरत राहणार आहेत. त्यासोबतच याठिकाणी एक रुग्णवाहिका देखील २४ तास तैनात असणार आहे. याव्यतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरा, आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे व साधन सामग्री, औषध गोळ्या इत्यादी बाबी देखील या केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.