मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्यावरून मुंबईचे राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज भाजप नेत्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत? यामागे कोणता तर्क आहे, असा प्रश्न अस्लम शेख यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.
हेही वाचा - सूडबुद्धीने फडणवीसांची सुरक्षा काढणाऱ्या मुख्यमंत्र्यांना घरात कशाला हवी सुरक्षा?
अस्लम शेख म्हणाले की, मागील दहा वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येला पायाभूत सोयीसुविधा पुरवताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असल्याकारणाने मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तासनतास प्रवास करावा लागतो.
मुंबई विभाजनाचा डाव कसा?
मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणे सुलभ व्हावे, यासाठी जर मुंबई उपनगरासाठी व शहरसाठी स्वंतत्र जिल्हाधिकारी असतील व नागरिकांची समस्या समाधानाची प्रक्रिया वेगाने व्हावी, यासाठी दोन पालकमंत्री असतील तर, बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्याला भाजप नेत्यांचा विरोध का? दोन जिल्हाधिकारी व दोन पालकमंत्र्यांमुळे जर मुंबईचे विभाजन होत नसेल तर, मुंबईसाठी दोन आयुक्त नेमणे हा मुंबई विभाजनाचा डाव कसा काय ठरू शकतो, असा प्रश्न अस्लम शेख यांनी भाजप नेत्यांना विचारला आहे.
हेही वाचा - कुंपणच खातंय शेत? ताडोबात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, पर्यावरणाची मोठी हानी