मुंबई - मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला आहे. ढिगाऱ्याखाली 40 ते 50 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान युद्धपातळीवर काम चालू असून जे. जे. हॉस्पीटलमध्ये जखमींसाठी स्वतंत्र वार्ड आरक्षित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
"मलबा हलवायचा आहे. मात्र, इमारत कोसळली आहे तेथील भाग खुप अडचणीचा आणि चिंचोळा असल्याने गाडी आणि इतर कुठलेही मदतीचे साधनं जात नाहीत; मात्र स्थानिकांचे, महापालिकेचे, पोलीस आणि एनडीआरएफचे युद्धपातळीवर काम चालू आहे. ५ व्यक्ती अॅडमीट असून २ व्यक्ती मृत झालेल्या आहेत. जे जे हॉस्पीटलमध्ये जखमींसाठी स्वतंत्र वार्ड आरक्षीत करण्यात आला असून जखमींना मदत केली जाईल." असेही पुढे ते म्हणाले.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश जास्त असण्याची शक्यता आहे. मदत आणि बचावकार्य सुरु असताना पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. स्थानिकांनी ही इमारत कोसळल्याची माहिती दिली होती. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमलाही पाचारण करण्यात आलं असून मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. मदत व बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.