मुंबई - घाटकोपरमधील विद्याविहार पश्चिम येथे नेव्हल गेटजवळ 30 डिसेंबर रोजी सकाळी नाल्याच्या बाजूला एक मृतदेह आढळून आला होता. अंदाजे 40 वर्षाच्या महिलेचा शीर व दोन्ही पाय नसलेला मृतदेह पाहून परिसरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच्या तपासाअंती, मुलानेच आपल्या आईचा खून केल्याचे उघड झाले आहे.
मोहम्मद सोहेल शफी शेख (33) असे या नराधम मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहेल शेख हा आपल्या आईसह कुर्ला पश्चिम येथील महाजनवाडीमध्ये राहत होता. 28 डिसेंबरला आईसोबत झालेल्या क्षुल्लक वादावरून सोहेलने घरीच गळा दाबून तिचा खून केला होता. यानंतर त्याने हा मृतदेह घरीच ठेवला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 डिसेंबरला त्याने आईचे दागिने गहाण ठेवले. त्यातून आलेल्या पैशातून त्याने आपली गहाण ठेवलेली स्कूटर सोडवून आणली, तर काही पैसे मैत्रिणीला दिले.
यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी शीर आणि दोन पाय धडापासून वेगळे केले. चादरीमध्ये धड गुंडाळून त्याने ते विद्याविहार परिसरात नेऊन टाकले. तर, शीर हे कुर्ला कारशेड येथे टाकले. दोन पाय त्याने कुर्ला परिसरातच टाकले होते. घाटकोपर पोलिसांनी कसून शोध घेत या प्रकरणाचा छडा लावला, आणि सोहेलला अटक केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : राधानगरी युनियन बँक दरोडा प्रकरणाला नवे वळण; 18 लाखांचे दागिने चोरी झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा