मुंबई - शिक्षणाचा दर्जा घसरल्याने तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा कल असल्याने गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमांच्या 113 शाळा बंद पडल्या आहेत. याच कालावधीत तब्बल 47 हजार विद्यार्थ्यांनी पालिका शाळा सोडल्याचे समोर आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना दिलेल्या सोयी सुविधा, दर्जेदार व डिजिटल शिक्षणामुळे पुन्हा पालक आणि विद्यार्थी पालिका शाळांकडे वळत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या शाळांना पुन्हा 'अच्छे दिन' येऊ लागले आहेत.
मराठी भाषिक शाळा बंद पडल्या - मुंबई महानगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पुरवणे त्यासह शिक्षण आणि आरोग्य सुविधा पुरवणे हे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. पालिकेच्या नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सुमारे 1 हजार 150 शाळा असून स्वतःच्या मालकीच्या 467 शालेय इमारती आहेत. यात 3 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पालिका शाळांची अवस्था आणि देण्यात येणारे शिक्षण यामुळे गेल्या काही वर्षापर्यंत शिक्षणाचा दर्जा घसरला होता. त्यातच मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषांच्या शाळांकडे पालकांचा ओढा असल्याने पालिकेच्या मराठी व इतर भाषेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होऊ लागली. 2012-13 मध्ये 385 मराठी शाळा होत्या. त्यात 81 हजार 216 विद्यार्थी शिक्षण घेत होते. 2021-22 मध्ये 272 मराठी शाळा राहिल्या असून त्यात 34 हजार 14 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या दहा वर्षात 113 मराठी शाळा बंद पडल्या असून 47 हजार 202 विद्यार्थी कमी झाले आहेत.
दर्जेदार, डिजिटल शिक्षण - मुंबई महानगरपालिकेच्या मराठी भाषिक शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शाळा बंद पडू लागल्या. यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या. शाळांमधील शिक्षकांना चांगले इंग्रजी शिकवता यावे यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये एकसूत्रता यावी, सर्व शाळांचा सामाजिक दर्जा एकसमान गुणवत्तापूर्ण रहावा, यासाठी सर्व शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ ( Mumbai Public School ) या नावाने ओळखल्या जात आहेत. सर्व पालिका शाळांना एकाच प्रकारचा रंग दिला जात आहे. शाळांवरील नावाचे फलक आकर्षित बनवले जात आहेत. वर्गात चांगले बेंच, विद्यार्थ्यांना आवडेल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे शिक्षण दिले जाते. दप्तराचे ओझे कमी व्हावे म्हणून टॅबद्वारे शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्गखोल्या (क्लासरूम) डिजिटल केल्या जात आहेत, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली.
आंतराराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू - महापालिकेने गेल्या काही वर्षात ज्या मराठी शाळा बंद झाल्या त्याऐवजी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. तसेच सी.बी.एस.ई. बोर्डच्या 11 ( CBSE Board ) , आय.सी.एस.ई. बोर्डची 1 ( ICSC Board ) शाळा सुरू केली आहे. या शाळांना दिल्ली बोर्डाची संलग्नता प्राप्त झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आय. बी. ( I. B. - International Baccalaureate ) बोर्डची शाळा सुरू करण्यात आली आहे. त्यासोबतच, माटुंगा येथील एल.के. वाघजी महानगरपालिका शालेय इमारतीमध्ये केंब्रिज विद्यापीठाशी संलग्नीत आय.जी.सी.एस.ई. ( IGCSE - International General Certificate of Secondary Education ) बोर्डची शाळा सुरू केली जाणार आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
पालिका शाळांना नवा साज - पालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळा मिळाव्यात यासाठी शालेय इमारतींच्या मोठ्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी केली जात आहे. पालिकेच्या शाळांचे 'मुंबई पब्लिक स्कुल' असे नामकरण करण्यात आले आहे. सर्व शाळांना एकच रंग देण्यात येत आहे. शाळांवर पालिकेचे लोगो लावण्यात येत आहेत. 2021 पासून किरकोळ व तात्काळ दुरुस्तीसाठी 2 वर्षांसाठी सात झोनमध्ये कंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शाळांच्या मोठ्या दुरुस्तीसाठी 68 कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामधील 27 कामे चालू आर्थिक वर्षात तर 41 कामे पुढील आर्थिक वर्षात केली जाणार आहेत. शाळांच्या पुनर्बांधणीची 35 कामे प्रगतीपथावर असून 32 कामे पुढील वर्षी केली जाणार आहेत. शाळांच्या दुरुस्त्या, दर्जोन्नती आणि पुनर्बांधणी यासाठी पालिकेने 419 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
विद्यार्थ्यांची संख्या वाढतेय - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार आणि डिजिटल शिक्षण दिले जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांसह आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी मिशन ऍडमिशन सुरू करण्यात आले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून 40 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
म्हणून मुलाला पालिकेच्या शाळेत ऍडमिशन - मी ठाणे येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. माझा पगार कमी आहे. मी सुद्धा पालिकेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. मला त्या शिक्षणाचा उपयोग झाला आहे. मला माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा होता. मात्र, पालिकेने इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्याने पालिकेच्या घाटकोपर पश्चिम येथील साईनाथ नगर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आहे. पालिकेच्या शाळेत चांगले शिक्षण मिळते, असे छगन घाणेकर यांनी सांगितले.
2020 मध्ये निकालात झाली होती विक्रमी वाढ - 2016 मध्ये दहावीचा निकाल 76.97 टक्के लागला होता. 2017 मध्ये 8.6 टक्क्यांनी घट होऊन 68.91 पर्यंत निकाल खालावला होता. 2018 मध्ये 5 टक्क्यांची वाढ होऊन 73.81 टक्के निकाल लागला होता. 2019 मध्ये अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे निकालात 20.66 टक्क्यांनी घट होऊन 53.15 टक्के निकाल लागला. 2020 मध्ये 40.10 टक्क्यांची विक्रमी वाढ होऊन 93.25 टक्के लागला होता. 2022 मध्ये 97.10 टक्के लागला आहे.
हेही वाचा - Voting permission denied : मुख्यमंत्र्यांना खुर्ची जाण्याची भीती- किरीट सोमय्या