मुंबई - कथित 100 कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Minister Anil Deshmukh ) यांना ईडीने अटक केली होती. अटक केल्यापासून अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांनी आज (दि. २७ जानेवारी) मुंबई सत्र न्यायालयातील PMLA न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला ( Bail Application ) आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयात डिफॉल्ट जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर आज अनिल देशमुख यांनी PMLA कोर्टात जामीनासाठी अर्ज केला आहे. आता या अर्जावर 3 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यावेळी अनिल देशमुख यांना दिलासा मिळतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून त्यांच्या जामीनासाठी भरपूर प्रयत्न करण्यात आले. पण, देशमुखांना जामीन मिळणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुख यांचा डिफॉल्ट जामीन अर्ज फेटाळला आहे. देशमुख आणि राज्य सरकारला हा सर्वात मोठा झटका आहे. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनिल देशमुख यांच्याकडून विशेष पीएमएलए कोर्टात आज अर्ज करण्यात आला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर अनिल देशमुख यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सध्या देशमुख आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांना 2 नोव्हेंबरला ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात अटक केली होती.
अनिल देशमुख यांच्याविरोधात 7 हजार पानी आरोपपत्र - कथित 100 कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 78 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील PMLA कोर्टात ईडीने सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्रही दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांची पत्नीचा भाऊ यांना देखील सहा आरोपी म्हणून आरोपपत्रात दाखवले आहे.
अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याला अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने फरार घोषित केले आहे. या प्रकरणात एकूण 3 जणांना ईडीने फरार घोषित केले आहे. वारंवार समन्स देवून देखील अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा चौकशीला हजर राहिला नाही. मात्र, याप्रकरणी अटकेपासून आपल्याला संरक्षण मिळावे यासाठी ऋषिकेश देशमुख याने न्यायालयात धाव घेतली होती. पण, याप्रकरणी अजूनही न्यायालयीन प्रक्रिया सुरूच आहे.