मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात मुसळधार पावसात ओढवणाऱ्या आपत्तीला तोंड देण्यासाठी राज्य रस्ते महामंडळ सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष 24 तास ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पावसादरम्यान झाडांची पडझड, पाणी साचणे, अपघात, वाहतूककोंडी आदी विविध तक्रारी सोडवण्यासाठी १ जून ते 30 सप्टेंबरपर्यंत कक्ष कार्यान्वित राहणार आहे.
कामे पूर्ण करण्याच्या सूचना : एमएमआयडीएअंतर्गत मेट्रो, उड्डाणपुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणावर ही कामे होणार असून, सध्या प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. उड्डाणपुलाची देखभाल आणि दुरुस्तीची कामे अभियांत्रिकी विभागाकडे आहेत. कामांमुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठेकेदारांना सूचना, सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अशी असणार कार्यपद्धती : मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदी महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अशा विविध संस्थांच्या आपत्ती नियंत्रण कक्षासोबत समन्वय साधून, नागरिकांना मदत करणार आहे. तीन शिफ्टमध्ये कर्मचारी येथे काम करणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिर यांनी दिली.
नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक : 022 - 26517935, 022 - 26420914
हेही वाचा : कोरोनासह मुंबईतील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्री घेणार आढावा