मुंबई - लोकल ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला पांढरा शर्ट, काळी पॅंट आणि काळा कोट घालून टीसी तिकिटांची विचारणा करत असलेलं तर सावधान. कारण तुमची फसवणूक होऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीकडून प्रवाशांची लूट होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या मदतीने मागील 8 महिन्यांत उपनगरीय स्थानकांवर पाच बनावट टीसी पकडले आहेत.
प्रवाशांच्या फसवणूकीच्या तक्रारी -
कोरोनामुळे गेल्या काही महिन्यापासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल ट्रेनचे दार बंद आहे. मात्र, आता १५ ऑगस्ट २०२१ कोरोनाचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा आहे. त्यामुळे विना तिकिट लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यासाठी रेल्वे स्थानकावर ठिकठिकाणी तिकिट तपासनीस तैनात केले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यापासून बनावट टीसीकडून प्रवाशांची लूट करत असल्याच्या तक्रारी रेल्वेकडे आलेल्या होत्या. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकिट तपासणी कर्मचाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलीस यांच्या मदतीने मागील जानेवारी ते ऑगस्ट 2021 दरम्यान उपनगरीय स्थानकांवर आणि रेल्वे गाड्यांमधून 5 बनावट तिकिट टीसींना पकडण्यात यश आले आहे.
आठ महिन्यात कारवाई -
ऑगस्ट महिन्यात दादर येथील हेड टिसी सुखवीर जाटव यांनी एका व्यक्तीला फलाट क्रमांक 5 वर प्रवाशांकडून तिकिट तपासताना पाहिले. त्यांना संशय आला आणि त्यांनी त्याला ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. त्या व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला रेल्वे पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.मे 2021 मध्ये गाडी क्रमांक 02538 डाऊन विशेष कुशीनगर एक्स्प्रेसच्या डी 1 डब्यातील प्रवाशांना एक व्यक्ती पावती देत होता व पैसे स्वीकारत होता. त्यानंतर सीनिअर टीटीई अनंत कुमार यांनी चौकशी केली असता, त्यांना आढळले की तो बनावट टीसी आहे. एप्रिल 2021 रोजी कल्याण रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 01071 विशेष कामायनी एक्स्प्रेसमध्ये डी 1 डब्यातील टीटीई हरिमंगल यादव यांनी बनावट टीसी शोधला. मार्च 2021 रोजी हेड टीसी सिकंदरजीत सिंग आणि हेड टीसी सुश्री वाघचौरे यांना शीव स्थानकात बनावट टीसी शोधला. तर, याच महिन्यात सॅडहर्स्ट रोड स्थानकावरील सीनिअर टीसी राजू गुजर यांनीही एक बनावट टीसी पकडला होता.
हेही वाचा - सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; 'हे' आहेत आजचे दर
हेही वाचा - Corona update : मुंबईत रुग्णसंख्या दुप्पट तर ११ दिवसात रुग्ण दुपटीचा कालावधी ४४६ दिवसांनी घसरला