औरंगाबाद / मुंबई : 1 मे रोजी औरंगाबादेत मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानावर झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत नियम मोडल्याप्रकरणी औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसात ( City Chowk Police Station Aurangabad ) गुन्हा दाखल करण्यात आला ( FIR Registered Against MNS Chief Raj Thackeray ) आहे. भादंवि कलम ११६, ११७, १३५ आणि १५३ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडकावणारे भाषण भोवणार : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा होत असताना पोलिसांनी १६ नियम दिले होते. त्यात भडकावणारे भाषण करू नये असं सुचित करण्यात आलं होत. मात्र, राज ठाकरे यांनी भडकावणारे भाषण केले. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा निष्कर्ष लावण्यात आला. त्यानुसार कलम 153 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर १६ पैकी १२ नियम मोडले असल्याचं पोलिसांनी म्हणलं आहे. त्यात चिथावणीखोर भाषण करणे, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, आवाजाची मर्यादा ओलांडणे, मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणे हे आणि असे नियम तोडल्याचं यात म्हणण्यात आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह आयोजकांवर हे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तर राज ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा : औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे.
कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश - दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.
मनसे पदाधिकारी अटकेत : उद्यापासून होत असलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार मनसे विभागप्रमुख महेंद्र भानुशाली यांना घाटकोपर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. भानुशाली यांच्या कार्यालयात जाऊन भोंगाही जप्त करण्यात आला. भानुशाली यांनी सर्वप्रथम भोंग्यावर हनुमान चालीसा वाजवली होती. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाईला सुरुवात झाली आहे.
गृहमंत्री - मुख्यमंत्र्यांची बैठक : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.
राज ठाकरेंची भूमिका काय? : दरम्यान, राज ठाकरे यांनी ३ मे रोजी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र ईद असल्याने कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये असे ट्विट त्यांनी केले होते. तसेच पुढची भूमिका आज ट्विट करून जाहीर करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय? याची वाट मनसैनिक पाहत आहेत.
हेही वाचा : Raj Thackeray Live Update : राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड सुरु