मुंबई- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले. त्यानंतर हाताला काम नसल्याने काही प्रमाणात परप्रांतीय कामगार स्थलांतर करू लागले आहेत. मात्र आता गेल्या वर्षीची खोटे व्हिडिओ टाकून काही समाजकंटक अफवा पसरविण्याचे काम करत असल्याचे समोर आले होते. यासबंधीचे वृत्त सर्वप्रथम ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. त्यानंतर रेल्वेने अफवा पसरविण्या समाजकंटकाचा शोध लावला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासबंधीत पत्र सुद्धा रेल्वेने प्रकाशित केले आहेत.
खोट्या व्हिडिओमुळे तणावपूर्ण परिस्थिती -
राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी उपाययोजना म्हणून राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत पुन्हा कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यामुळे बाजारपेठा, मॉल, खासगी कार्यालये आणि सर्वसामान्य दुकानांचे शटर बंद करण्यात आले आहे. परिणामी या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नसल्याने काही कामगारांनी गावाकडची वाट पकडली आहे.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. परिणामी लाखोंच्या संख्येत परप्रांतीय मजुरांनी रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती. तशी परिस्थिती आता निर्माण झाली असल्याचे खोटे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले होते. त्यामुळे यावेळीही परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. मात्र हे व्हिडिओ खोटे असल्याची माहिती सर्वप्रथम ईटीव्ही भारतने प्रकाशित केली होती. याची रेल्वेने तत्काळ दखल घेतली आहे.
व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई-
ईटीव्ही भारताने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर मध्य रेल्वेने स्थानिक पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि सायबर सेलच्या मदतनी या व्हिडिओची चौकशी केली असता, हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलिसांनी लावला आहे. आता त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहेत.
काय होता व्हिडिओ-
गुरुवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून प्लॅटफॉर्म क्रमांक 18 वर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे, अशा प्रकारचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आलेला होता. कोविड काळात अशा प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होताच काही काळात तणाव पूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. जेव्हा या व्हिडिओची चौकशी करण्यात आली. तेव्हा व्हिडिओ गेल्यावर्षी आहे असं निदर्शनास आले आहे. त्यामुळे खोटी अफवा पसरवण्याचे काम करणाऱ्या अशा समाजकंटकाना शोध पोलिसानी घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.