मुंबई - आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मुंबई दौऱ्यावर आहेत, नुकतंच त्यांचं मुंबईत आगमन झालं. विमानतळाबाहेर भाजपच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे. यावेळी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली देखील काढली. निर्मला सीतारामन यांनी विमातळाहून दादरमधील भाजपच्या कार्यालयाकडे प्रस्थान केले आहे.
कॉंग्रेसकडून घोषणाबाजी
दरम्यान अर्थमंत्री सीतारामन यांचे मुंबई विमानतळावर आगमन होताच, कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निर्मला सीतारामन या आपल्या आजच्या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या उद्योगपतींची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. त्यानंतर त्या पत्रकार परिषद घेणार आहेत. अर्थसंकल्पानंतरचा हा पहिलाच दौरा असल्याने पत्रकार परिषदेमध्ये सीतारामन काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.