मुंबई - कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना ( Onion farmers in financial trouble ) तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी दोन लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी ( Purchase of 2 lakh metric tonnes of Onion ) करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्री पियूष गोयल ( Piyush Goyal, Minister of Food and Public Supplies ) यांना केली आहे.
देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात - कांदा हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असून देशातील एकूण उत्पादनाच्या 35 ते 40 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. चांगल्या पावसामुळे कांद्याचे उत्पादन 2021-22 मध्ये 136.70 लाख मेट्रिक टन झाले जे की त्यापूर्वीच्या वर्षीपेक्षा 20 लाख मेट्रिक टनाने जास्त होते. एकंदरच बाजारपेठेतील किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. यामुळे कांदा उत्पादकांमध्ये निराशा आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले. एरवी श्रीलंकेकडून मोठ्या प्रमाणावर कांदा आयात होत होते. तेथील आर्थिक संकटामुळे या आयातीमध्ये देखील अडचणी आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सततच्या बदलत्या परिस्थितीमुळे आपल्याकडील शेतकऱ्यांना निर्यातीतून उत्तम किंमत मिळणे शक्य होत नाही, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांच्या फायद्याचे होईल - केंद्र सरकारने देखील निर्यात उत्पादनावरील शुल्क आणि कर माफीच्या योजनेत 2 टक्के ऐवजी 10 टक्क्यांपर्यंत लाभ वाढवून द्यावा, ही राज्य सरकारची विनंती केली होती. केंद्र सरकारने ती देखील नाकारली आहे. आपल्या मंत्रालयाने या योजनेत 10 टक्क्यांपर्यंत लाभ दिल्यास शेतकऱ्यांच्या फायद्याचे होईल. त्याचप्रमाणे सध्या नाफेड कडून कांदा खरेदी सुरु आहे. ती आणखी 2 लाख मेट्रिक टनाने वाढवावी, अशी देखील विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. नाफेडने यापूर्वीच 2.38 लाख मेट्रिक टनाने कांदा खरेदी यावर्षी एप्रिल ते जून मध्ये केली आहे. आणखी 2 लाख मेट्रिक टनाने खरेदी केल्यास कांदा उत्पादकांना किंमतीच्या बाबतीत दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.