हैदराबाद - सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. काल रात्री 9.15 वाजताच्या सुमारास, तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद झाले. त्यामुळे वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
फेसबुकक, व्हट्सअॅपकडून दिलगिरी -
भारतासह अनेक देशांमधील लोक या समस्येला सामोरे जात आहेत. हे तिन्ही प्लॅटफॉर्म बंद असल्यामुळे ट्विटरवर लोक सतत तक्रारी करत आहेत. व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर मॅसेज पाठवताना किंवा रिसीव्ह करताना समस्या येत आहे. तर इन्स्टाग्राममध्येही पोस्ट पाहण्यात समस्या येत आहे. फेसबुकच्या प्रवक्त्याने असे म्हटले आहे की, सर्व काही सुरळीत करण्याचे कंपनी काम करत आहे. तसेच व्हॉट्सअॅप, फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मॅसेज लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे. आम्ही गुंता सोडवण्याचं काम करत आहोत. लवकरच सर्व काही सुरळीत होईल”, असे फेसबुकने आपल्या मॅसेजमध्ये लिहीले आहे. तसेच व्हॉट्सअॅपने देखील आपल्या ग्राहकांची माफी मागितली आहे.
भारतात मोठी बाजारपेठ -
वेब आणि स्मार्टफोन या दोन्ही ठिकाणी तिन्ही अॅप चालत नाहीत. अँड्रॉइड, आयओएस आणि वेबवर तिन्ही अॅप ठप्प आहेत. लोकांनी पाठवलेले मॅसेज अर्ध्यावरच अडकले आहेत. डाउन डिटेक्टरवर लोकांनी याबाबतच्या तक्रारी दिल्या आहेत. भारतात फेसबुकचे ४१० दशलक्षाहून अधिक, व्हॉट्सअॅपचे ५३० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. इन्स्टाग्रामचे भारतात २१० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत. या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे.