मुंबई - वडाळ्यातील बीपीटी रुग्णालयात कोविड-19 कक्ष सुरू करण्यात आला. येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र, या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी अशा 250 जणांसह रुग्णांच्याही जीवाशी खेळ सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अगदी पीपीई (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट) किटच्या दर्जापासून रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह आहेत. रुग्णालयात कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नसतानाही येथे कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येत आहेत. रुग्णालयात आतापर्यंत दोन रुग्ण दगावले आहेत. एका नर्सला करोनाची लागण झाली आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे आता हे रुग्णालयच एकप्रकारे कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने कर्मचारी धास्तावले आहेत. त्यांनी हे रुग्णालय त्वरित सील करण्याची मागणी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : शिक्षण विभागासमोर विविध विद्यापीठांच्या आणि महाविद्यालयीन परीक्षांचा मेळ घालण्याचे आव्हान
बीपीटी रुग्णालयातील 250 कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ ?
मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बीपीटीचे रुग्णालय कोविड-19 रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र, हे करताना या रुग्णालयात कोविड-19 शी लढण्यासाठी पुरेशा सुविधा आहेत का ? याचा कोणताही विचार रुग्णालय व्यवस्थापनाने केला नाही. अशात हे रुग्णालय सुरू झाल्याबरोबर कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. मात्र, काही रुग्णांना कोरोना कक्षात न ठेवता जनरल वॉर्डमध्येच ठेवण्यात आले. त्यांच्या अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाला कोरोना वॉर्डमध्ये नेण्यात आले आहे. मात्र, तोपर्यंत या रुग्णांच्या संपर्कात अनेक नर्स आणि आया आल्या होत्या. त्यामुळे त्यातील काही जणांनाच क्वारंटाइन करत इतरांना क्वारंटाईन करण्यास नकार देण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे नकार देण्यात आलेल्याच एका नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आतापर्यंत 4 रुग्णांपैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एकाला कस्तुरबामध्ये हलवण्यात आल्यानंतर त्याचा तिथे मृत्यू झाला आहे. तसेच आ एक नर्स आणि एक कोरोनाबाधित रुग्ण येथे उपचार घेत आहे.
हेही वाचा.... ईटीव्ही भारत विशेष : कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत; विद्यार्थी, प्रशिक्षित तरुण आणि पालकांवर होणार परिणाम
रुग्णालयात आरोग्य सुविधांची ऐशी की तैशी...तरीही कोरोनाग्रस्त रुग्णांवर होतात उपचार
रुग्णालय व्यवस्थापन कशा प्रकारे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे, याचे आणखी एक उदाहरण म्हणजे कोरोनाग्रस्त रुग्णांचे कपडे कर्मचाऱ्यांकडूनच धुवून घेतले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कपड्यांचे निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे केले जात नाही. एकूणच रुग्णालयात व्यवस्थापन आणि नियोजनाचा सगळा बोजवारा उजाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव आता टांगणीला लागला आहे.
सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयात काम करणे हे धोकादायक असल्याचे म्हणत कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या व्यवस्थापनाविरोधात थेट मुख्यमंत्र्याकडेच दाद मागितली आहे. त्यांनी एक पत्र लिहित व्यवस्थापनाची पोलखोल केली आहे. तर खासगी रुग्णालयाप्रमाणे हे रुग्णालय त्वरित सील करावे. नाही तर रुग्णालयाबरोबर संपूर्ण परिसरात कोरोनाची दहशत होईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आपल्याला वाचवतात का ? याकडेच या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे डोळे लागले आहेत.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात