मुंबई - शालेय शिक्षण विभागाने आज 'राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती' गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड तर उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बच्चू कडू काम पाहणार आहेत. यांच्यासह एकूण २४ जणांचा या समितीत समावेश आहे. यात राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय मंडळ यांच्या प्रतिनिधींसोबतच विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, 'प्रथम' संस्थेचे प्रमुख माधव चव्हाण आदींचाही समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा... कौतुकास्पद! रायगड जिल्हा धान्य दुकानदार संघटनेतर्फे कोरोनाग्रस्तांसाठी एक कोटींची मदत
राज्य शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांतील मुलांना समान आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळवण्यासाठी बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातील अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा घडवून आणली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम सल्लागार समिती ही अभ्यासक्रम ठरवणार आहे. या समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असल्याने पुढील कोणत्या वर्षी हा अभ्यासक्रम निश्चित होईल, याबाबत कोणतीही स्पष्टता विभागाकडून आजच्या जीआरमध्ये देण्यात आली नाही. त्यातच या समितीच्या बैठका या आवश्यकतेनुसार घेतल्या जाणार असल्याचे नमूद केले आहे.
इतर राज्यांतील शाळांचा अभ्यास करणार...
ही समिती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अन्य राज्यात असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा तुलनात्मक अभ्यास करून त्यासाठी विषयनिहाय उपसमित्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमाद्वारे अपेक्षित फलनिष्पत्ती करणे आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शनही करणार आहे. तर या समितीसाठी मुंबईतील एस.एल.एन. ग्लोबल नेटवर्कचे या खासगी संस्थेचे संस्थापक फ्रान्सिस जोसेफ हे समन्वयक असणार आहेत.
हेही वाचा... डॉक्टरांची चिठ्ठी आणल्यास मद्यपींना मिळणार दारू, राज्य सरकारचा निर्णय
'त्या' शाळांना मिळणार पाठ्यपुस्तके...
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. मात्र, आज काढण्यात आलेल्या अभ्यासक्रम सल्लागार समितीच्या जीआरमध्ये शिक्षण विभागाच्या सचिव वंदना कृष्णा यांनी 'त्या' बरखास्त करण्यात आलेल्या मंडळाच्या ८१ शाळांमधील पहिली ते पाचवीच्या वर्गात प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचा सुधारीत अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सात जणांची 'राज्यस्तरीय अभ्यासक्रम निर्मिती समिती' गठीत करण्यात केली आहे.