मुंबई - सत्ता येताच जंगल वाचवण्याचे वचन देणाऱ्या शिवसेनेला आठवण करून देण्यासाठी आरे बचाव समितीच्या वतीने शपथविधी होताच सेनाभवनाच्या बाहेर निदर्शने करून नव्या सरकारला आठवण करून दिली. यावेळी 'Save Aarey' अशा आशयाचे फलक समितीच्या वतीने झळकवण्यात आले.
उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वपक्षीय कार्यकर्ते दादरच्या दिशेने जात होते. यावेळी सेनाभवन समोरील रस्ता दुभाजकावर उभे राहून सेवादलाचे कार्यकर्ते घोषणा देत आरे जंगल वाचवण्याची मागणी करत होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, आरे जंगल तोडले जात असताना सेनेचे नेते राज्यात भाजपच्या दुराग्रहामुळे ही जंगलतोड होत असल्याचे सांगत होते. तसेच, आम्ही सत्तेत आल्यास आरे वाचवू, असे वचनही ते देत होते. त्याचीच आठवण करण्यासाठी आज पर्यावरणप्रेमींनी निदर्शने करत आठवण करून दिली.
आरेच्या जंगलातील झाडे तोडून मेट्रो कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेमींकडून जोरदार विरोध होत आहे. ‘सेव्ह आरे’ मोहिमेत आबालवृद्ध सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी मानवी साखळ्या बनवून आपला विरोध दर्शवला केला होता. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आरे वाचवण्यासाठी कळकळीची विनंती केली. सत्ता येताच आरेचे संवर्धन करू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याबाबत नवे सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.