मुंबई - महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj ) यांचा आजच्या दिवशी म्हणजे ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक झाला होता. या दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमीकडून दरवर्षी रायगडावर ( Raigad ) राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा केला जातो. यंदाही रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा केला जात आहे. लाखोच्या संख्येत शिवप्रेमींनी हजेरी लावली असून ढोल-ताशा, तुतारी, तलवारी, भगवे झेंडे नाचवून उत्सवाचा जल्लोष साजरा करत आहेत. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने युवराज संभाजीराजे ( Sambhaji Raje ) व शहाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन Coronation Day सोहळा पार पडणार आहे.
यंदा शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त - कोरोना प्रादुर्भावानंतर यंदा शिवराज्याभिषेक सोहळा निर्बंधमुक्त होत आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर 5 आणि 6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजीराजे छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदा 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' आणि 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असतील. देशभरातील लाखो शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर स्नान करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. शिवाजी महाराजांनी यावेळी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. अष्टप्रधानांतील आठ प्रधानांनी गंगेसह विविध नद्यांतून आणलेल्या पाण्याच्या जलकुंभांनी शिवाजी महाराजांवर अभिषेक केला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला.
छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच, शिवस्वराज्यभिषेक दिन. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा. त्यामुळे दरवर्षी रायगडावर अत्यंत उत्साहात, जल्लोषात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील अवघ्या मराठी माणसासाठी एक आनंदाचा उत्सवच आहे. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी असंख्य शिवप्रेमी रायगडावर जातात आणि तिथे शिवराज्याभिषेक साजरा करतात. या दिनाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी 6 जून हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागानं 1 जानेवारी 2021 रोजी परिपत्रकाद्वारे हा निर्णय घेतला. या अनुषंगाने यापुढे दरवर्षी 6 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करणार आहे.
गेल्या वर्षी खासदार संभाजी छत्रपतींनी अत्यंत कष्टाने सुवर्ण होन मिळवल्याची फेसबुक पेजवरून माहिती दिली होती. स्वराज्याचे सार्वभौमत्व व संपन्नतेचे प्रतीक असणारा ‘होन’ हे केवळ चलन नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ऐतिहासिक ठेवा असल्याचे त्यांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे सुवर्ण होन छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वभौम स्वराज्याचे प्रतिक आहेत. महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला आणि आपले सुवर्ण होन स्वराज्यात चलनात आणले. हे सुवर्ण होन आता शक्यतो पाहायला मिळत नाहीत. हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच ते सध्या उपलब्ध असतील. आपण सहसा जे पाहतो, ती शिवराई असते. शिवराई आपल्याला खूप भेटतील. परंतु होन भेटणे अत्यंत दुर्मिळ असून इतिहासकार, अभ्यासक, आणि शिवभक्तांसाठी हा अत्यंत अमूल्य ठेवा आहे.
रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला येणाऱ्या शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमाची रुपरेषा, गडावर जाण्याचे व उतरण्याचे प्रमुख मार्ग, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा, अन्नछत्र, स्वच्छतागृहे, महिलांसाठी करण्यात आलेली स्वतंत्र व्यवस्था, गडाच्या पायथ्याला असलेली वाहनतळे, पायथ्याचे अन्नछत्र याची सर्व माहिती व नकाशे QR कोड च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केली आहे. गडावर व पायथ्याशी ३५ ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या असून गंगासागर तलावासह ४ ठिकाणी आरओ वॉटर सुविधा उपलब्ध असेल.
गडाच्या पायथ्याला, पाचाड व कोंझर येथे वाहने पार्किंग सुविधा केलेली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने पाच ते सात किमी दूर उभी केली जाणार आहेत. येथून शिवप्रेमींना ये-जा करण्यासाठी खास बस सुविधा मोफत ठेवण्यात आल्या आहेत. गडावर विद्युत रोषणाई केली असून रायगडावर ये-जा करताना कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तातडीने मदतकार्य मिळावे यासाठी विविध रेस्क्यू टिम व ट्रेकर्स तैनात करण्यात आले आहेत. ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, अग्निशमन अशा विविध शासकीय यंत्रणांसह अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, विविध संस्था, रेस्क्यू टीम, ट्रेकर्स हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
हेही वाचा - अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा व्हिडिओ