मुंबई - महापालिकेच्या घनकचरा, मलनिस्सारण विभागात कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळावे, थकीत वेतनातील फरक मिळावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली आज(शुक्रवारी) आझाद मैदान येथे कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले होते.
हेही वाचा - 'लेडी सिंघम': महिला पोलीस उपनिरीक्षक बनली 'हिरोईन'
महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत मुंबई शहर व उपनगरातील भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची प्रचालन व परीक्षणाचे तसेच मेनहोलमधील गाळ काढण्यासारखी महत्त्वाची कामे गेल्या कित्येक वर्षांपासून तथाकथित ठेकेदारमार्फत कामगार करत आहेत. काम करत असताना ठेकेदारांकडून आणि पालिकेकडून बेकायदेशीर व अन्यायकारक वागणूक या सफाई कामगारांना मिळत आहे. विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. याच्या विरोधात पालिकेला वारंवार पत्रव्यवहार व निवेदन देऊन देखील यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे. आमच्या प्रश्नांवर पालिका आयुक्तांनी आमच्याशी चर्चा करावी, अशी आमची मागणी असल्याचे कामगारांनी सांगितले.
हेही वाचा - 'राज्यकर्ते अजून किती निर्भयांचे बळी जाण्याची वाट पाहणार आहेत'
महाराष्ट्र शासनाने 24 फेब्रुवारी 2015 रोजी किमान वेतन देण्यासंदर्भात परिपत्रक काढले. परंतु, अजून देखील हे वेतन त्यांना किमान देण्यात आलेले नाही. कामगारांची वेतन जाहीर होऊन चार वर्षे झाली आहेत. प्रत्येक कामगारांचे किमान वेतन थकबाकी दोन लाख रुपये मिळणे बाकी आहे. ते त्यांना मिळावे तसेच कामगार विमा भविष्य निर्वाह निधी, कामगारांना कोणतीही सुरक्षिततेची साधने पुरवली जात नाहीत, ती मिळावीत. पर्जन्य विभागातील कामगारांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कारवाई करावी, यासह विविध मागण्या घेऊन या कामगारांनी आझाद मैदान येथे आज एक दिवसीय धरणे आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियन विभागीय संघटक गौतम शेळके यांनी सांगितले.
पालिका प्रशासन यांना या कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील ते दाद देत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलेले आहे. जर, या आंदोलनाची देखील प्रशासनाने दखल घेत दाद दिली नाही तर, आगामी काळात कामगार तीव्र आंदोलन उभारतील, असे शिर्के यांनी सांगितले.