मुंबई - ज्या चालकांची २५ वर्षे विना अपघात सेवा झाली आहे. अशा चालकांचा यापुढे राज्य स्तरावर सत्कार केला जाईल. तसेच त्यांना २५ हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली. चुकलेल्या चालकांना ज्याप्रमाणे आपण शिक्षा करतो. त्याचप्रमाणे चांगले काम करणाऱ्याचेही आपण कौतुक करायला पाहिजे, असे मत परब यांनी व्यक्त केले.
मुंबई विभागातील ५ चालकांचा गौरव-
सुरक्षित प्रवास हेच प्रमुख ध्येय असलेल्या एसटी महामंडळाने १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान रस्ते सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन परब यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल आगार येथे पार पडले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण एसटी महामंडळाची ३१ विभागीय कार्यालये व २५० आगारात करण्यात आले होते. यावेळी एसटी महामंडळात गेली २५ वर्षाहून अधिक काळ विना अपघात सेवा देणारे भारत कोल्हे, कीर्ती कुमार पाटील, परशुराम बंडेकर, सुदेश समुद्रे, महादेव जगधने या मुंबई विभागातील ५ चालकांचा परिवहन मंत्री अॅड. परब यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृती चिन्ह देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला.
लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागो-
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, विना अपघात गाडी चालविणाऱ्याचा मला अभिमान आहे. एसटीचे चालक हे उत्तम प्रशिक्षित चालक असतात. अशी कौतुकाची थाप देतानाच राज्यातील प्रत्येक आगारात, असे अनेक चालक आहेत. ज्या चालकांनी २५ वर्ष विना अपघात सेवा दिली आहे. त्यांना यापुढे २५ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येईल, असे परिवहन मंत्र्यांनी जाहीर केले. तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी महामंडळाच्या स्तरावर जे प्रयत्न केले जातात, त्या प्रयत्नांना यश लाभो. व लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागो, अशी आशा परब यांनी व्यक्त केली.
याबरोबरच, रस्ते सुरक्षितता अभियान हा कार्यक्रम केवळ आठवडाभरासाठी, १५ दिवसासाठी किंवा महिनाभरासाठी न राबवता. ही मोहीम वर्षाचे ३६५ दिवस व २४ तास असायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली.
याप्रसंगी बोलताना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, केवळ एसटीच्या प्रवांशाचेच नव्हे तर रस्त्यावर चालणारे पादचारी, सर्व प्रकारच्या लहान मोठ्या वाहनातून प्रवास करणारे प्रवाशी, यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचा संस्कार एसटीच्या चालकांवर रुजविणे, हा रस्ते सुरक्षितता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.
हेही वाचा- अमली पदार्थ तस्करीप्रकरणी अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्यासह दोघांना अटक