छत्रपती संभाजी महाराजांवर सुरू असलेल्या मालिकेत महाराजांना अटक झाल्याचं दाखवलं आहे. मालिका शेवटच्या टप्प्यात आहे. महाराजांना अटक झाल्यावर त्यांना ज्या वेदना देण्यात आल्या त्या आम्हाला पहावल्या जाणार नाहीत. आमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे वैयक्तिक मत मांडल्याच अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
झी वाहिनीवर गेल्या काही वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित मालिका सादर केली जात आहे. संभाजी महाराजांच्या जीवनावर असलेली मालिका हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराजांचं शौर्य दाखवलं गेलं. त्यामुळे अनेक युवकांना राजांचं महत्त्व कळलं. मात्र मालिका अंतिम टप्प्यात आली आहे. संभाजी महाराजांची अटक दाखवण्यात आली असून त्यापुढे महाराजांवर ओढवलेले प्रसंग दाखवू नयेत. कारण ज्या पद्धतीने त्यांचा मृत्यू झाला ते अनेकांना पाहणं, त्यांच्या भावना दुखावणारं असेल. काही लोक त्या मालिकेचा आधार घेत राजकारणदेखील करतील. त्यामुळे पुढचं चित्रीकरण दाखवू नये, अशी विनंती असल्याचं मत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं. याबाबत झी समूह आणि मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्याबाबत आपण आपलं वैयक्तिक मत मांडू, असंदेखील खोतकर यांनी सांगितलं.