मुंबई - मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. मात्र अडीच वर्ष सरकार चालल्यानंतर सत्तेतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून कलगीतुरा रंगला आहे का? अशी चर्चा आता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्रीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाचा ( CM post dispute ) वाद सुरु झालाय का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र हा वाद शिवसेना आणि भारतीय जनता ( Shiv Sena and BJP ) पक्षात नसून सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी ( Shiv Sena and NCP ) काँग्रेसमध्ये सुरू झालेले चित्र सध्या पाहायला मिळते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदावर दावेदारी सांगण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीमधील असलेल्या प्रमुख दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून चढाओढ सुरू आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आई तुळजाभवानीची पूजा करत असताना मुख्यमंत्रिपदाचाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर 4 जूनला साताऱ्यात कार्यक्रमादरम्यान 2024 नंतर राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री असेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून लागोपाठ असे झालेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा डोळा असल्याबाबत चर्चा रंगल्या.
'मलाही वाटते उद्धव ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे' : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्रीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, आपल्यालाही वाटते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे जाऊन पंतप्रधान व्हावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा सर्वश्रुत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्मावर हात घालण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटील यांनी केला. जळगावात एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा चिमटा काढला. तसेच सातत्याने शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे देखील महाविकास आघाडी सरकार पुढे पंचवीस वर्षे टिकेल आणि राज्याचे मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडे असेल, असे सातत्याने सांगत असतात.
'राजकीय महत्वकांक्षेतून वक्तव्य' : कोणताही राजकीय पक्ष एक महत्वकांक्षा ठेवून राजकीय वाटचाल करत असते. आपला पक्ष वाढावा, आपला पक्षाचा मुख्यमंत्री राज्यात असावा असे प्रत्येक पक्षाला वाटते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून, असे वक्तव्य होणे स्वाभाविक आहे. इतर पक्षाकडूनही अशी वक्तव्य सातत्याने होत असतात. मात्र सत्तेत असलेल्या प्रमुख दोन पक्ष्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेमध्ये नक्कीच चुकीचा संदेश जात असतो. त्यामुळे सत्तेत असलेल्या पक्षांनी असे वक्तव्य करणे टाळावे, असे राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.
'पक्ष वाढवण्याचा सर्वांना अधिकार' : आपला पक्ष वाढविण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी महत्वकांक्षा ठेवणे यात काहीही गैर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केली गेली असतील तर, यात काहीही चूक नसल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. नक्कीच तिन्ही पक्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत सामील आहेत. मात्र आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असे सर्वांनाच वाटत असते. स्वप्न बघण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मात्र सध्या काही लोक दिवा स्वप्न बघत असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्रीपदावरून नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.
हेही वाचा - Raj Thackeray : एक घाव दोन तुकडे करणाऱ्या राज ठाकरेंचा मात्र पुन्हा यूटर्न?