मुंबई - मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येतात. कांदिवली पूर्व येथील धीरज एनक्लेव्ह गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी मतदान केल्यावर मेन्टेनन्समध्ये 200रुपये सूट दिली आहे. तसेच दिवाळी जवळ असल्याने पणत्या भेट स्वरुपात वाटण्यात येणार आहेत. यासाठी सोसायटीने मतदान करण्यासाठी बाहेर पडा, आणि दोनशे रुपये मेंटेनसमध्ये सवलत मिळवा, असे आमंत्रण पत्रक छापले आहे. 'तुम्ही देखील मतदान करा, फरक पडतो'; असे आवाहन या संस्थेकडून करण्यात येत आहे.
सोमवारी(दि.21ऑक्टो) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्याचा या संकल्पनेमागील उद्देश आहे. या संस्थेत ए, बी, सी,डी अशा 4 विंग असून, सुमारे 154 निवासी फ्लॅटधारक आहेत. संस्थेच्या कमिटीने सदस्यांना मतदान बूथपर्यंत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था देखील केली आहे.
धीरज एनक्लेव्ह या संस्थेने घेतलेल्या या उपक्रमाला संस्थेच्या सदस्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. तसेच सोसायटीतून 100 टक्के मतदान होईल,असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे.