मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्या वर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. मात्र याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सोमवारी शून्य रुग्णांची नोंद झाली होती. आज पुन्हा दुसऱ्या दिवशी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे सलग दोन दिवस धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरात धारावीमध्ये आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
धारावी आठव्यांदा शून्यावर -
मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्ण संख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्यांदा, २६ जानेवारीला तिसर्यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबई फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र धारावीत १४ जूनला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज पुन्हा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. धारावीत आतापर्यंत आठव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.
धारावी मॉडेल -
१ एप्रिल २०२० ला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली तसेच हे मॉडेल अनेकठिकाणी राबवण्यात आले आहे.