मुंबई- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड पुकारल आहे. या सर्व सत्तेच्या सारीपाटात भारतीय जनता पक्ष शांत आपला तरी, अलिप्त नाही. भारतीय जनता पक्षाची सत्ता आणण्यासाठी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) पडद्यामागून सूत्र फिरवत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिकस्त दिल्यास फडणवीस यांची राजकीय अस्तित्व पणाला लागली आहे.
महाविकास आघाडी आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाची रस्त्यावर आणि कायदेशीर लढाई सुरू आहे. एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर आक्रमक झाले आहेत. तर तिथेच महाविकास आघाडीने बंडखोरी करणाऱ्या गटाला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी रणनीती तयार केली आहे. तर एकनाथ शिंदे गटही रस्त्याच्या आणि कायदेशीर लढाईला सज्ज झाला आहे. मात्र, राज्यामध्ये एवढी मोठी राजकीय उलथापालथ होत असताना, राज्यातला विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष हा अद्यापही शांत असलेला पाहायला मिळतोय. या सर्व बंडाशी आपलं काहीही घेणं देणं नाही, असे भासवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष या सर्व राजकीय उलथापालथीत अलिप्त नाही. 21 जून पासून महाविकास आघाडीत उठलेल्या बंडानंतर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या गुप्त बैठकांचा सिलसिला सुरू झालेला पाहायला मिळाला.
षड्यंत्र मागे भारतीय जनता पक्ष? - महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेली लढाईच्या मागे भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र, या प्रकरणाची भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही. हे सातत्याने भारतीय जनता पक्ष सांगतात आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर भारतीय जनता पक्षाच्या सर्व प्रकरणात अभिज्ञ आपल्याचे सांगितले आहे. मात्र, एकनाथ शिंदे गट सुरतला आणि त्यानंतर गोहाटीला जात असताना बंडखोर आमदारांच्या गटासोबत विमानतळावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रातील राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, राज्याचे माजी मंत्री संजय कुटे, तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज भारतीय हे उपस्थित होते. त्यामुळे भारतीय जनता पक्षावर संशय अधिक बळावतोय.
देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या - राज्यांमध्ये होत असणारी राजकीय उलथापालथ पाहता देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत दिल्लीत तीन गुप्त बैठका घेतल्या आहेत. या सर्व प्रकरणावर सातत्याने दिल्लीतील जेष्ठ नेतेमंडळीशी ते संपर्कात आहेत. तसेच मुंबईतील आपल्या शासकीय निवासस्थानी त्यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे. मात्र, हे सर्व होत असताना, राज्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळींना चकार शब्द न काढण्याची तंबी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा सत्तापालट करण्याचा प्रयत्न - युतीत असलेल्या शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून युती तोडत महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतांना, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना सोबतीला घेऊन राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी आपले सर्व आमदार पुन्हा परत आणले. देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर अनेकदा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून हे सरकार काही दिवसातच कोसळेल असा दावा करण्यात येत होता. आता पुन्हा एकदा राज्यांमध्ये सत्तापलट होण्याच वारे वाहत आहे. यामागे देवेंद्र फडणवीस यांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या प्रकरणात दिल्लीच्या आपल्या पक्षश्रेष्ठींची ही मदत देवेंद्र फडणवीस घेत आहेत. अपक्ष आणि शिवसेना पक्षाचे एकूण 50 आमदार एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यांना सोबत घेत, येणाऱ्या दिवसांमध्ये सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भाजप कडून केला जाणार आहे. मात्र, अशा परिस्थितही शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून, आपली सत्ता टिकवल्यास तो खूप मोठा झटका देवेंद्र फडणवीस यांना असणार आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष आपली सत्ता स्थापन करू शकला नाही तर, देवेंद्र फडणवीस यांच दिल्लीतील महत्व कमी होणार आहे. दुसऱ्यांदा महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला एवढा मोठा शह दिल्यास देशपातळीवर भारतीय जनता पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसणार आहे. त्याचे पडसाद देशभर उमटतील. 2024 च्या लोकसभा निवडणूकीत देखील त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसू शकतो. याचा अंदाज भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस आपलं प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकत असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो यांनी व्यक्त केले आहे.
बंडखोर आमदारांवर अद्याप विश्वास नाही - राज्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणीस यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवारचं मतं कमी असताना देखील निवडून आणले. हा खूप मोठा झटका महाविकास आघाडीला होता. या विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या वरील विश्वास राज्यासहित दिल्लीत वाढला. एकनाथ शिंदे गटाला हाताशी धरूनचं त्यांनी हा विजय संपादन केल्याचं आता जग जाहीर झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांच्या गटासोबत भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेचा प्रयत्न करेल. मात्र, सध्या काही तांत्रिक मुद्दे स्पष्ट झाल्याशिवाय भारतीय जनता पक्ष थेट समोर येण्याचे टाळत आहे. महाविकास आघाडीकडून 16 आमदारांचे सदस्यत्त्व रद्द करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या आमदारांपैकी काही आमदार परत शिवसेनेत येणार असल्याचा दावा सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत करत आहेत. त्यातच आपण बंद पुकारला असला, तरी अद्यापही शिवसेनेतच आहोत असे काही आमदारांकडून सातत्याने सांगितले जात आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत एकनाथ शिंदे गटाला त्याचा थेट फटका पडणार आहे. याचा परिणाम भारतीय जनता पक्षावर होईल. त्यामुळे सर्व तांत्रिक बाजू आपल्या सोईप्रमाणे होत नाही, तोपर्यंत थेट भारतीय जनता पक्ष या लढाईत उतरणार नाही याची काळजी देवेंद्र फडणवीस घेत आहेत.