मुंबई - महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची जय्यत तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या स्थायी समितीत तिसऱ्या लाटेच्या सज्जतेसाठी कोट्यावधींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर जास्त दरात औषधे व सामुग्री खरेदी करण्यात आली असून त्यात भ्रष्टाचार झाल्याचा तसेच कोरोना काळात कंत्राटदार अरबपती झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.
कोरोना संदर्भातील खर्चाला मंजूरी -
मुंबईत गेल्यावर्षी कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. यावर्षी फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी होत असल्याने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून निर्बंधामध्ये शिथिलता दिली जात आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता दिल्यावर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची तसेच तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने जम्बो कोविड सेंटरमधील औषधांसाठी २० कोटी ७२ लाखांच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. कांदीवलीत ६३ बेडचे अद्ययावत कोविड सेंटर पुन्हा सुरु केले जाणार असून कोविड वॉर्डसाठी साडे आठ कोटींपर्यंतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता उद्भवु नये याकरीता बीएमसी मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन टॅक उभारणार आहे. याकरीता सव्वापाच कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. कोरोनाशी संबंधित अशा अनेक प्रस्तावांना स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
कंत्राटदार अरबपती -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अनेक प्रस्ताव आणले. त्यातील बहुतेक प्रस्ताव हे जादा दराने खरेदीचे होते. कोरोनाच्या नावाने पन्नास टक्के अधिक दराने खरेदी करण्यात आली आहे. औषध आणि सामुग्रीचा साठा कमी आहे असे दाखवून जादा दराने ही खरेदी केली जात आहे. कोरोनाच्या काळात जादा दराने प्रशासनाकडून खरेदी केली जात असल्याने कंत्राटदार अरबपती बनल्याची टिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे.
कमतरता भासू नये -
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पालिका प्रशासन आणि राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यता वर्तवण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांना औषधे, ऑक्सिजन, बेड आदींची कमतरता भासू नये म्हणून पालिका प्रशासनाने आणलेल्या प्रस्तवाला मंजुरी देण्यात आल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईत आज, उद्या असे दोन दिवस लसीकरण बंद