मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या विभागातील नागरिकांना खुश करण्यासाठी लॅपटॉप आणि टॅब वाटप करणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून स्थायी समितीत करण्यात आला. मात्र विरोधकांचा हा आरोप फेटाळत विरोधकांनी नगरसेवकांना कोणत्या वस्तू देता येतात याचा अभ्यास करावा तसेच विरोधकांनी विरोधी पक्षातच रहावे सत्तेत यायचा विचार करू नये, असा टोला यशवंत जाधव यांनी लगावला.
मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत वॉर्ड क्रमांक २०९ मध्ये गरजू नागरिकांना वह्या, लॅपटॉप तसेच टॅब देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याचे ठरावात म्हटले होते. हा प्रस्ताव आपल्याच वॉर्डमधील असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मंजूर केला. त्यावर विरोधी पक्षांनी आपल्याला बोलायला न देताच प्रस्ताव मंजूर केल्याने नाराजी व्यक्त केली. प्रस्तावावर बोलायला न मिळाल्याने विरोधी पक्ष नेते रावी राजा यांनी हरकतीचा मुद्दा मांडत या निधीमधून शिलाई मशीन, घरघंटी दिली जाते, पहिल्यांदाच लॅपटॉप, टॅब देण्यात येणार आहेत. असे लॅपटॉप, टॅब स्थायी समिती अध्यक्षांच्या वॉर्डमध्येच न वाटता सर्वच २२७ नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये वाटावेत अशी मागणी केली. तर समाजवादी पक्षाचे गटनेते राईस शेख यांनी वस्त्या वाटपाबाबात निकष ठरवावेत अशी मागणी केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका राखी जाधव यांनीही स्थायी समिती अध्यक्षांनी आपल्या विभागाप्रमाणे इतर नगरसेवकांच्या वॉर्डमध्येही लॅपटॉप आणि टॅब वाटता यावेत यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
सत्तेत यायचा विचार करू नका -
यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी नगरसेवकांना ज्या वस्तू वाटप करता येतात त्याच वस्तू प्रस्तावात नमूद करण्यात आल्या आहेत. इतर नगरसेवकांनी आपल्या विभागात लॅपटॉप, टॅब वाटपाचे प्रस्ताव आणल्यास ते प्रस्तावही मंजूर केले जातील. त्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक आणि गटनेत्यांनी आपल्याला नागरिकांना कोणत्या वस्तू देता येतात याचा अभ्यास करावा, अशी सूचना केली. तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकांनी आपण आहे त्याठिकाणी राहावे सत्तेत यायचा विचार करू नका, असा टोला लगावला.