मुंबई - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन आता ईडीनेही गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कोरोना हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकारने जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी गुन्हा दाखल केल्याचा घणाघात, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांंनी केला. तसेच हा गुन्हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे आणि लोकशाहीला घातक स्वरुपाचा असल्याचेही ते म्हणाले.
राजकीय सूडबुध्दीची कारवाई -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार सीबीआयने त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयात ही मागणी प्रलंबित असताना ईडीने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कॉंग्रेसने यावरुन मोदी सरकारला फटकारले. माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावरील ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतिक आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न आहे. तसेच राजकीय सूडबुद्धी असल्याचा आरोप सावंत यांनी केला.
![congress leader Sachin Sawant , Sachin Sawant tweet, Anil Deshmukh , Anil Deshmukh ED action ,सचिन सावंत, ईडीची अनिल देशमुखांवर कारवाई , अनिल देशमुख न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-sachin-sawant-on-pm-7209781_11052021124102_1105f_1620717062_233.jpg)
राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे चेष्टा-
परमबीर सिंह यांच्या खोट्या आरोपांवरून कारवाई करण्यात आली. आरोपांचे विश्लेषण केले तरी सचिन वाझेने १०० कोटी जमवण्यास सांगितले असे म्हटले. मात्र, परमबीर सिंह यांनीच आरोप केले आहेत. परंतु, पैसे दिले असे आरोपकर्तेही म्हणत नाही. त्यामुळे सीबीआय धाडी कशावर टाकत होती? पैसे दिलेच नाही तर ईडी कशाला? असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. तसेच पैसे दिले असे सीबीआय आणि ईडीचे म्हणणे असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का होत नाही? हा मोदी सरकारने सुरू केलेला राजकीय छळ आहे, हे स्पष्ट होते असे सचिन सावंत म्हणाले. परंतु, जनता ही आता सगळ ओळखून असे सांगत राष्ट्रीय तपास यंत्रणांची कारवाई म्हणजे जोक झाल्याचे सावंत म्हणाले.
काय आहे प्रकरण -
काही दिवसांपूर्वी अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि त्यानंतर त्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही प्रकरणांवरून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आरोप करणारं खळबळजनक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
हेही वाचा - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल