मुंबई - 'शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावे' संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्याची तक्रार काँग्रेसने थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कटुता निर्माण होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या विरोधात खंबीरपणे उभं राहायचं असेल तर यूपीएचं अध्यक्षपद शरद पवारांकडे द्यायला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान यापूर्वी देखील एकदा त्यांनी युपीएचे अध्यक्ष शरद पवारांना करावे असे म्हटले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये संतापाची लाट आहे. म्हणूनच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. तसेच संजय राऊत हे चर्चेत राहण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्ये करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते - पटोले
शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष झाले पाहिजेत असं वारंवार संजय राऊत म्हणत आहेत. त्यामुळे राज्यातील कॉंग्रेस नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे नाही, तर शरद पवारांचे प्रवक्ते आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. तसेच शिवसेना हा युपीएचा घटक पक्ष नसल्याने त्यांना अशाप्रकारचे वक्तव्य करण्याचा अधिकार नसल्याचे देखील पटोले यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे आणि सोनिया गांधी यांची भेट
शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष व्हावेत असं वक्तव्य दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये केलं होतं. या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर होता. या आधीही संजय राऊत यांनी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे दिलं गेलं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट झाली.
संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे भाजपला संधी?
शरद पवारांना यूपीएचे अध्यक्ष करा अशा प्रकारचे वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून वारंवार होत असल्याने, भारतीय जनता पार्टीला महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याची संधी चालून आली आहे. तीन पक्षाच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका भाजप सातत्याने करत आहे. दरम्यान आता संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेस नाराज झाल्याने, भाजपला टीकेसाठी आणखी एक मुद्दा सापडला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत कटूता निर्माण झाल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - कर्मचाऱ्यांसाठी सक्षम अन्याय निवारण यंत्रणा उभारावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी