मुंबई - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मुंबईत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत 'हर घर तिरंगा' ( Har Ghar Tiranga ) अभियान राबवले जाणार आहे. मात्र या अभियानासाठी वाटप करण्यात आलेले राष्ट्रध्वज हे ध्वज संहितेचे ( Tiranga Scam ) अवमान करणारे असल्याने ही मोहिम वादात फसली आहे. दरम्यान या विरोधात आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
'अवमान करणारे राष्ट्रध्वज' : 'हर घर तिरंगा' अभियानानुसार मुंबईत महापालिकेकडून राष्ट्रध्वज वाटप केले जात आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून हे ध्वज पालिकेला पुरवण्यात आले आहे. वाटप करण्यात येणाऱ्या ध्वजाचे माप वेगवेगळे आहे. ध्वजामधील तीनही रंगाच्या पट्या एकाच मापाच्या असल्या पाहिजेत. मात्र प्रत्येक रंगाच्या पट्टीचे माप वेगवेगळे आहे. अशोक चक्र गोल असले पाहिजे, मात्र त्याचा आकारच वेगळा आहे. हे राष्ट्रध्वज संहितेचे अवमान करणारे आहेत, अशी माहिती घाटकोपर येथील कांग्रेसचे उत्तर -पूर्व जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अब्राहम रॉय मनी व १२६ ब्लॉकचे अध्यक्ष नासीर गौहर खान यांनी दिली आहे.
'आंदोलन उभारले जाणार' : ज्यांनी ५० वर्षे भारतीय ध्वज लावला नाही ते आज ध्वज घरा घरात लावण्यास सांगत आहेत. घाटकोपर पश्चिम श्रेयस सिनेमा विभागात तिरंगा ध्वज वाटप करताना संहितेचे अवमान करणारे ध्वज वाटप करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. यासाठी या विरोधात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा अब्राहम रॉय मनी व नासीर गौहर खान यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता आमच्याकडील चांगले ध्वज वेगळे करून वाटप करण्यात येत आहे. इतर ध्वज वाटप योग्य नसल्याने आमच्या कार्यालयात पडून आहेत. ध्वज वाटप आम्हाला मजबुरी म्हणून करावे लागत असल्याचे सांगितले.
मुंबईत ८ लाख ध्वजांचे वाटप : भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवा निमित्त मुंबई महापालिका प्रशासनानेही १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत असून या अभियाना अंतर्गत ३५ लाख निवासस्थाने व विविध अस्थापने या ठिकाणी ५० लाख मोफत राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ८ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले आहे. घर, दुकान, सरकारी खासगी कार्यालय आदी ठिकाणी या राष्ट्रध्वजाचे वाटप केले जात आहे, अशी माहिती अशी माहिती पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाचे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
हेही वाचा - Har Ghar Tiranga : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ