मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे काँग्रेसने बुधवारी निलंबन रद्द केले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हे निलंबन रद्द केले असल्याची माहिती काँग्रसेचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील यांनी दिली. यासाठी पाटील यांनी सतिश चतुर्वेदी यांना आपले निलंबन मागे घेण्यात येत असल्याचे पत्र पाठवले आहे. तसेच या निर्णयाची एक प्रत नागपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनाही पाठवून देण्यात आली आहे.
नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवारांना प्रत्यक्ष मदत केल्याचा ठपका चतुर्वेदीवर ठेवण्यात आला होता. त्यामुळे २३ फेब्रुवारी २०१८ रोजी चतुर्वेदी यांचे निलंबन करण्यात आले होते. चतुर्वेदी यांचे निलंबन केल्यानंतर सतिश चतुर्वेदी आणि पुत्र दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत हेाते. त्यासाठीची तयारीही त्यांनी केली होती. मात्र मध्येच त्यांनी त्यांचा निर्णय लांबणीवर टाकला होता. सतीश चतुर्वेदी हे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते आहे. पूर्व नागपूर हा त्यांचा मतदारसंघ होता. 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपचे नेते कृष्णा खोपडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत देखील त्यांना यश मिळवता आले नाही. 2014 नंतर सक्रिय राजकारणात त्यांचा फारसा वावर नव्हता.