मुंबई - कोरोना रुग्णांची सर्वाधिक नोंद होत आहे. मुंबईत आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येने ५ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना चाचण्या वाढवल्याने ही रुग्णवाढ दिसून येत आहे. पुढील सहा ते आठ आठवडे रोज १० हजार रुग्णांची नोंद झाली तरी ती परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असल्याचा दावा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केला आहे. याचवेळी दिवसाला २१ हजार रुग्ण आढळून येण्याची शक्यताही आयुक्तांनी व्यक्त केली आहे. मुंबईकरांनी भीती बाळगू नये असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
पालिका आयुक्तांचा दावा -
मुंबईत गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला. गेले वर्षभर केलेल्या प्रयत्नानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिकेला यश आले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये देण्यात आलेली शिथिलता, लोकल ट्रेनमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना देण्यात आलेला प्रवेश आदी कारणांमुळे गर्दी उसळू लागली आहे. या गर्दीमुळे आणि लोकांकडून कोरोना नियमांची पायमल्ली केली जात असल्याने २४ मार्चला ५१८५ रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रात १० हजार रुग्ण दिवसाला आढळून आले तरी पालिका सज्ज असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.
पालिकेची तयारी -
कोरोना रुग्ण समोर यावेत म्हणून चाचण्या केल्या जात आहेत. दिवसाला २० ते २५ हजार चाचण्या केल्या जात होत्या. त्यात वाढ करून दिवसाला ४७ हजार चाचण्या केल्या जात आहेत. आठवडाभरात दिवसाला ६० हजार चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बुधवारी २४ मार्चला मुंबईत ४७ हजार चाचण्या झाल्या असून त्यात ५ हजार ३६५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ८४ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. सध्याच्या परीस्थीतीत ८३ ते ८४ टक्के बाधीतांमध्ये लक्षण आढळत नाहीत. तर, दहा हजार रुग्णांमध्ये १५ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे आढळून आली तरी त्यांच्यासाठी आवश्यक असलेली तयारी करुन ठेवण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. आतापर्यंत मुंबईकरांनी ज्या पध्दतीने कोरोना नियमांचे पालन केले त्याच पध्दतीने नियमांचे पालन करावे असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.
दहा लाख लसीकरण -
१६ जानेवारीपासून मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना सुरुवातीला लस दिली जात होती. १ मार्चपासून ६० वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षामधील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लास देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत मुंबईने लसीकरणाचा १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या दिवसाला ४५ हजार लसीकरण होत असून दिवसाला १ लाख लसीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
मृत्यूदर नियंत्रणात -
मुंबईत १० फेब्रुवारी ते २४ मार्च या काळात कोरोनामुळे २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या काळात कोविडचा मृत्यूदर ०.३ टक्के राखण्यात महापालिकेला यश आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. यावरुन मुंबईतील परीस्थीती नियंत्रणात असून नागरिकांनी भिऊ नये असा दिलासा आयुक्तांनी दिला आहे.