मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (रविवार) रात्री साडे आठ वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. याबाबतचे संकेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना, काही नियम शिथिल केले जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची सरासरी आकडेवारी कमी होत असली तरी, अजूनही 21 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये असलेल्या एकवीस जिल्ह्यांना सध्यातरी दिलासा दिला जाणार नाही. मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. त्या भागात नियमांमध्ये शिथिलता आणून काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न असणार आहे. व्यापारी वर्गाची अडचण लक्षात घेता व्यापाऱ्यांना दुकाने उघडी ठेवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी वाढवून दिला जाणार असल्याची शक्यता आहे.
टप्याटप्याने लॉकडाऊन उघडण्याची शक्यता -
1 जूननंतर पहिला टप्यात व्यापाऱ्यांना दिलासा दिला जाईल. दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाईल. सध्या सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेड झोन मधील 18 जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात जिल्हा बंदी उठवली जाऊ शकते. त्यानंतर दुसऱ्या टप्पात दैनंदिन गरजांशी संबंधित अन्य काही दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची अट शिथिल करून 50 लोकांपर्यंत केला जाऊ शकतो. मात्र रेड झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना यातून वगळण्यात येईल. तिसऱ्या टप्पात हॉटेल्स, परमिट रुम, बिअर बार, दारुच्या दुकानांना निर्बंधासह सुरु ठेवण्यास परवानगी असेल. हॉटेल्स आणि बारला ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. चौथ्या टप्पात मुंबई लोकल, धार्मिक स्थळं याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्यात अनलॉक करताना कोणतीही ढिलाई राज्यसरकार कडून करण्यात येणार नाही असे संकते देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल प्रवास, अंतरराज्यीय प्रवास यावर बंधने लवकर उठवण्यात येणार नाही.