मुंबई - धनगर आरक्षणासहित समाजाच्या भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. तसेच धनगर वाड्या वस्त्यामध्ये सोई- सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी दिली आहे. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते
मुख्यमंत्र्यांची ग्वाही - धनगर समाजाचे पारंपरिक वाद्य गजढोल आणि नृत्याद्वारे मुख्यमंत्र्यांचे ( CM Eknath Shinde ) स्वागत करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचा विशेष सन्मान धनगर समाजाकडून करण्यात आला. या मेळाव्यात राज्यातील धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासह प्रलंबित मागण्या आणि समस्यांवरही सकारात्मक चर्चा करण्यात आली. धनगर समाजाच्या विविध मागण्या यावेळी समाजाकडून करण्यात आल्या आहेत. हे सरकार समाजातील सर्व घटकांचे सरकार आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री - धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई- सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक ( Ahilyabai Holkar Memorial ) व्हावे, ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल. आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाड्या, वस्त्यांमध्ये सोई- सुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहे. कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार दादाजी भुसे,अब्दुल सत्तार, सुहास कांदे, माजी आमदार विजय शिवतारे, आयोजक माजी नगरसेवक योगेश जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - Kas Dam Video : सातारकरांची तहान भागविणाऱ्या कास धरणाचे महिला पदाधिकाऱ्यांनी केले ओटी भरण
हेही वाचा - Gold Silver Rates : सोने-चांदीचे दर आज स्थिर, पहा किती आहे सोन्याचा दर
हेही वाचा - Arpita Mukherjee Car Accident : अर्पिता मुखर्जींच्या ताफ्याला कारची धडक, अपघातात किरकोळ जखमी