मुंबई- सत्तेत आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. आरे कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्षभरात काम पूर्ण करायचा प्रयत्न आहे. कारशेडवरील बंदी उठवत शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झटका दिला आहे.
फडणवीस यांचा महत्वकांक्षी प्रकल्प - आरेतील कारशेडला कडाडून विरोध झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ बंदी घातली. तसेच आरेतील कारशेड कांजुरला हलवण्याचा निर्णय घेता. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दणका देत, आरेतील बंदी उठवली. त्यामुळे आरेमध्येच मेट्रो-३ प्रकल्पाचे कारशेड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा कारशेड हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
कारशेडला घातलेली बंदी उठवली - आरेमध्ये मेट्रो -३ प्रकल्पाचे कारशेड उभारण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. रातोरात हजारो झाडे कापण्यात आली. पर्यावरणवादी संघटनानी या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलन करत निषेध केला. शिवसेनेने ही कारशेड बनवू नये, अशी भूमिका घेतली. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच, आरेतील कारशेडचे काम बंद केले. कांजूरमार्ग येथे कारशेडसाठी पर्यायी जागेचा निर्णय घेतला होता. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये यावेळी जागेचा वाद रंगला. अखेर महाविकास आघाडी सरकार पायउतार होताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरेमध्येच कारशेडला घातलेली बंदी उठवली आहे. त्यामुळे आता आरेतच कारशेड उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
लवकरच आरे कारशेड कामाला सुरुवात - सर्वोच्च न्यायालयाने कारशेडसाठी आरेतील जागेला मंजुरी दिली होती. २५ टक्के काम येथे पूर्ण झाले होते. मुंबईकरांच्या हिताचा हा प्रकल्प असल्याने आरेमध्येच कारशेड बनायला पाहिजे. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे कारशेडचा मार्ग थांबला होता, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. मात्र आता आरेवरील कारशेडची बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवल्याने लवकरच प्रकल्प कामाला सुरुवात होईल. फास्टट्रॅकवर काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. सरकारने बंदी उठवली असली तरी पर्यावरण वाद्यांचा कडाडून विरोध आहे. त्यामुळे सरकार पर्यावरणवाद्यांची मनधरणी कशाप्रकारे करणार हे पाहावे लागणार आहे.