मुंबई - कोरोनाची लागण होऊन कर्मचारी आजारी पडल्यामुळे महापालिकेला मनुष्यबळ कमी पडत आहेत. त्यातच सफाई विभागात काम करणाऱ्या एफ नॉर्थ विभागातील 15 वर्ष काम करणाऱ्या 70 हुन अधिक मोटर लोडर कर्मचाऱ्यांचे काम काढून घेतले आहे. या आधीही काम मिळत नव्हते, आता पुढेही काम मिळणार नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही पालिका प्रशासन आणि हे कामगार सदस्य असलेली म्युनिसिपल मजदूर युनियन कामगारांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या सफाई विभागात कर्मचारी कमी असल्याने कंत्राटी पद्धतीने पदे भरली जातात. काही कामांसाठी कंत्राट देण्यात येते. महापालिकेच्या सफाई विभागात कचरा कुंडीत टाकला जाणारा कचरा गाडीमध्ये भरण्यासाठी मोटर लोडर हे पद आहे. या पदावर बहुतेक करून कंत्राटी कर्मचारी काम करतात. कंत्राटी कामगारांची घरे चालवीत त्यांना पगार मिळावा म्हणून कोर्टाने त्यांना महिन्यातून 26 दिवस काम द्यावे, असे आदेश दिले आहेत. मात्र पालिकेच्या एफ नॉर्थ विभागातील वडाळा ब्रिज चार रस्ता येथील चौकीत मोटर लोडर 70 हुन अधिक कर्मचारी काम करतात. आज सकाळी या ठिकाणी कचरा वाहतूक संघटनेच्या कामगारांना पाठवून या मोटर लोडर कामगारांना कामापासून वंचित ठेवण्यात आले आहे. गाडीमध्ये कचरा भरण्याचे काम करणाऱ्या कामगारांना रस्त्यावर झाडू मारण्याचे तसेच इतर कामे करण्यास सांगण्यात आले आहे.
महापालिका, युनियनचे दुर्लक्ष
कचरा गाडीमध्ये भरण्याचा आम्हाला 15 वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला अचानक दुसरे काम सांगितल्यास आम्ही ते काम कसे करू शकतो, असा प्रश्न कामगारांना पडला आहे. आमच्या जागी इतर कामगारांना काम दिल्याने आमची हजेरी लागणार नाही. कोर्टाने महिन्यातून 26 दिवस काम देण्याचे आदेश दिले आहेत, मात्र मला मागील महिन्यात 9 दिवस काम मिळाले. यामुळे पगारही 4500 रुपये इतकाच आला. त्यात आम्ही घर कसे चालवायचे असा प्रश्न निलेश जाधव यांनी उपस्थित केला आहे. आमच्या मागण्यांकडे आणि आमची होत असलेल्या उपासमारीकडे पालिका प्रशासन आणि आम्ही सदस्य असलेली म्युनिसिपल मजदूर युनियन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.