मुंबई - माटुंगा पश्चिम रेल्वे स्थानक सेनापती बापट रोडवर पुन्हा एकदा क्लीन अप वाल्यांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. दंडाच्या पैशापेक्षा जास्त रकमेची मागणी केल्यामुळे सर्व त्रस्त जनतेने त्याला जाब विचारला आहे. त्या दरम्यान वाद झाला असल्याची माहिती मिळाली आहे. विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून दंड वसुलीसाठी नेमलेले क्लीन अप मार्शल्स (clean up marshal) आणि सर्वसामान्यांमध्ये वाद, हाणामारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. याचा व्हिडीओ व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वाहतूक पोलीसही दिसत आहे.
मार्शलला चांगलाच चोप दिला
क्लीन अप मार्शलच्या भोवती नागरिक जमा झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या क्लीन अप मार्शलच्या हातात एक दगड असून तो नागरिकांना दगड फेकून मारण्याची धमकी देताना दिसत आहे. एका नागरिकाच्या पोटात या क्लीन अप मार्शलने गुद्दाही लगावला. त्यानंतर आक्रमक झालेल्या लोकांनी या क्लीन अप मार्शलला चांगलाच चोप दिला. एकाने तर त्याच्या डोक्यात हेल्मेटही मारल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर या क्लीन अप मार्शलने तिथून पळ काढला. मुंबईत क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये वाद होण्याची ही पहिली वेळ नाहीये. या अगोदरही असे वाद झाले आहेत.
महानगरपालिका आणि सरकारने कोरोनाच्या नावाने होणारी लूट थांबवावी
संतप्त नागरिक अंगावर येत असल्याचे पाहून या क्लीन अप मार्शलने दगडे मारण्यास सुरुवात केली. हा प्रसंग खूप वेळ चालू होता. पोलीस येण्यास खूप उशीर झाला. नेहमी पोलीस नाकाबंदीसाठी उभे असतात, पण अशा घटना घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा वेळ का घेते? असा प्रश्न विचारला जात आहे. कोणाचा जीव गेल्यावर पोलीस यंत्रणा, महानगरपालिका आणि सरकार अशा गोष्टीत लक्ष घालणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. महानगरपालिका आणि सरकारने कोरोनाच्या नावाने होणारी लूट थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा - विना मास्क मुंबईकरांवर कारवाई; ५८ कोटी ४२ लाखाचा दंड वसूल