नवी मुंबई - सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19मधील घरांचे हफ्ते थकीत असणाऱ्या तसेच ज्यांनी घरांचा एकही हफ्ता भरलेला नाही, अशा अर्जदारांना उर्वरित हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या “सर्वांसाठी घरे” धोरणांतर्गत सिडकोतर्फे नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या 5 नोडमध्ये सुमारे 25 हजार घरे ‘प्रधानमंत्री आवास योजने’ अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांकरिता घरे बनविण्यात आली होती. या योजनेची संगणकीय सोडत पार पडल्यानंतर, यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात येऊन पात्र ठरलेल्या अर्जदारांना सदनिकेच्या किंमतीच्या रकमेचा ठराविक हफ्त्यांमध्ये भरणा करण्यासाठी वेळापत्रक देण्यात आले होते. परंतु काही अर्जदारांनी एकाही हफ्त्याचा भरणा न केल्याचे तर काही अर्जदारांचे हफ्ते थकीत असल्याचे आढळून आले होते. या अर्जदारांच्या विनंतीवरून सदनिकेचे हफ्ते भरण्यासाठी 28 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या अंतिम दिनांकापर्यंतही काही अर्जदार हफ्ते भरण्यास असमर्थ ठरले होते.
31 जुलै 2021पर्यंत मुदतवाढ -
महामंडळाच्या गृहनिर्माण योजनेतील तरतुदींनुसार विहित मुदतीत हफ्ते न भरणाऱ्या अर्जदारांचे वाटपपत्र रद्द होऊ शकते. परंतु कोरोनाची साथ व त्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच या योजनेतील सर्व अर्जदार हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणे, या बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सिडको महामंडळाने सदनिकेचा एकही हफ्ता न भरलेल्या आणि उर्वरित हफ्ते थकीत असणाऱ्या संबंधित अर्जदारांना हफ्ते भरण्याकरिता 31 जुलै 2021पर्यंत मुदतवाढ देण्याचे तसेच 25 मार्च 2020 ते 31 जुलै 2021 या कालावधीत थकीत हफ्त्यांवर लागू होणारे विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अंतिम मुदतीपर्यंत संबंधित अर्जदारांनी थकित हफ्त्यांचा भरणा करावयाचा आहे. या निर्णयामुळे संबंधित अर्जदारांना निश्चितच दिलासा मिळणार आहे
थकीत हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने -
संबंधित अर्जदारांनी सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या संकेस्थळास भेट देऊन, त्यावरील Online Payment या टॅबचा वापर करून आपल्या थकीत हफ्त्यांच्या संपूर्ण रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. दिलेल्या मुदतवाढीचा संबंधित अर्जदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.