मुंबई - 'आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत, काळजी करू नका’, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना धीर दिला. स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वप्नीलचे आई, वडीलांचे सांत्वनही केले. तसेच स्वप्नीलच्या बहिणीला करता येईल, ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वस्तही केले. तिचे शिक्षण आणि पात्रतेनुसार तिला रोजगार संधी उपलब्ध करून देता येईल यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलमताई गोऱ्हे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सर्वश्री अनिल देसाई, विनायक राऊत, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पासलकर, सामाजिक कार्यकर्त्या कल्याणी वाघमोडे आदी उपस्थित होते.
'घटना दुर्देवी, पण धीराने घ्यावे लागेल'
मुख्यमंत्र्यांनी स्वप्नीलच्या आई छाया, वडील सुनील तसेच बहिण पूजा यांची आस्थेवाईक विचारपूसही केली. घटना दुर्देवी आहे. पण धीराने घ्यावे लागेल. आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत. काळजी करू नका, असा धीर दिला.
कालच शिवसेने केली होती 10 लाखांची मदत
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याने निराश होऊन आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांची शिवसेनेचे नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी लोणकर कुटुंबाला शिवसेनेकडून १० लाख रुपयांची मदत केली. या शिवाय स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले होते.
स्वप्नील लोणकर कोण आहे ?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. स्वप्नीलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्वप्नीलच्या आत्महत्येचे पडसाद महाराष्ट्रभर उटमले असून अनेकांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ढिसाळ कारभारावरून टीका केली आहे.
हेही वाचा - VIDEO : मुंबईत पावसाच कहर; रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम