मुंबई - मुंबईचे वैभव असलेल्या व्हिक्टोरिया गाडीत काही बदल करण्यात आले आहेत. या बदलानंतर ही गाडी पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत धावायला सज्ज झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी व्हिक्टोरिया गाडीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी परिवहन मंत्री अनिल परब, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि उबो राईड्ज या कंपनीचे संचालक शेखर खरोटे यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांनी घेतली व्हिक्टोरिया गाडीची माहिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्हिक्टोरिया गाडीची माहिती घेतली, आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते व्हिक्टोरिया गाडीचे चालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून व्हिक्टोरिया गाडीला मार्गस्थ करण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती घेऊन पाहणी केली. मुंबई व्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळे असलेल्या शहरांमध्ये देखील अशी सुविधा सुरु होणे गरजेचे असल्याचे यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळांची माहिती देेण्याची सुविधा या गाडीमध्ये असणार आहे.
मुंबई धावणार 40 व्हिक्टोरिया गाड्या
उबो राईड्ज या कंपनीला व्हिक्टोरिया गाड्या चालवण्याचे कत्रांट देण्यात आले आहे. एकूण 40 व्हिक्टोरिया गाड्या टप्प्या-टप्प्याने मुंबईत धावणार आहेत. पहिल्या टप्प्यात 12 गाड्या या दक्षिण मुंबईत सुरु करण्यात येणार आहेत. या 12 पैकी 6 व्हिक्टोरिया गाड्या 'गेट वे ऑफ इंडिया' येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील. तर उरलेल्या 6 व्हिक्टोरिया नरीमन पॉईंट येथून सुटणार आहेत. या व्हिक्टोरियामधून सायंकाळी 4 वाजल्यापासून मध्यरात्री 2 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे 250 बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही व्हिक्टोरिया पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर 70 ते 80 किमी पर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी इत्यादी ठिकाणी या सेवेचा विस्तार होणार आहे. तसेच लवकरच मुंबईबाहेर देखील या सेवेचा विस्तार होणार आहे.
असे असणार तिकीट दर
पहिल्या टप्प्यात 12 इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया गाड्या रस्त्यावर चालवण्यात येणार असून, त्याचे तिकिट दर सर्वसामान्य लोकांना परवडेल असे असणार आहेत. या व्हिक्टोरिया गाड्यांची प्रवासी क्षमता 6 असून, प्रत्येक व्यक्तीकडून भाड्यापोटी 100 रुपये आकारले जाणार आहेत. तर पूर्ण व्हिक्टोरिया बग्गीचे बुकिंग केल्यास सहा प्रवाशांनासाठी शॉर्ट ट्रीपकरिता एकूण 500 रुपये, तर लाँग ट्रीपसाठी एकूण 750 रुपये आकारण्यात येणार आहेत.
जाणून घ्या व्हिक्टोरीयाचा इतिहास
ब्रिटिश काळात प्रवासी वाहतुकीसाठी घोडागाडी होती. मात्र घोडा गाडीतून म्हणावा तेवढा आरामदायक प्रवास होत नव्हता. त्यामुळे आरामदायी प्रवासासाठी इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेर्ल्सने १८६९ साली नवीन रुपातली घोडागाडी फ्रान्समधून इंग्लंडला आयात केली. त्यानंतर १८८२ मध्ये प्रवासी वाहतुकीसाठी पहिली ‘व्हिक्टोरिया बग्गी’ मुंबईत आली. त्याला प्रवाशांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.