मुंबई- छत्रपती संभाजीराजे आजपासून आमरण उपोषणाला बसणार ( Chhatrapati Sambhajirajes Fast Till Death ) आहेत. मोठा लढा देऊनही मराठा समाजाला अद्याप आरक्षण ( Maratha Reservation ) मिळाले नाही. तसेच राज्य सरकारकडे असलेल्या काही मागण्या मराठा समाजाने केल्या होत्या. त्या देखील अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. याविरोधात छत्रपती संभाजीराजे आज मुंबई येथे आझाद मैदानात ( Aazad Maidan Mumbai ) आमरण उपोषणाला बसणार आहेत.
१५ फेब्रुवारीला केली होती घोषणा
15 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आमरण उपोषण करण्याचे जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सकाळी हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून छत्रपती संभाजी राजे साडेअकरा वाजता आमरण उपोषणाला सुरुवात करतील. ते एकटेच या उपोषणाला बसणार असून यासाठी त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. तसेच उपोषणाला मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला आझाद मैदानावर येताना पोलिसांनी अडवणूक करू नये, अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.
नंतरच जाणार आझाद मैदानात
सकाळी 10.50 मिनिटांनी आपल्या सर्व समन्वयकांसह मरीन ड्राईव्ह येथून हुतात्मा चौकाच्या ( Hutatma Smarak Mumbai ) दिशेने छत्रपती संभाजी राजे जातील. 11 वाजता हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून आझाद मैदानाच्या दिशेने प्रस्थान केले जाईल. आमरण उपोषणाला सुरुवात करण्याआधी पत्रकार परिषदेला संबोधित केले जाईल. त्यानंतर आमरण उपोषणाला सुरुवात होणार आहे.