मुंबई - महाविकास आघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरणार असेल तर हे राज्य तरी का ते चालवित आहे ? त्यांनी हे राज्य केंद्र सरकारच्या ताब्यात देऊन टाकावे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले. मी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा सवालदेखील भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी महाविकास आघाडी सरकरला विचारलेला आहे.
मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आगामी 15 दिवसात सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल, असे म्हटले आहे. मी अमित शहा किंवा तपास यंत्रणांच्या संपर्कात असल्याने मला ही माहिती मिळते असे नाही. तर या महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा एक अंदाज आहे. क्रिकेटमध्ये जसे सुरुवातीचे दोन फलंदाज बाद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर पुढचे फलंदाज हे पटापट ढेपाळतात असा टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडी सरकारला लगावला.
हेही वाचा-दिव्याखाली अंधार, फेब्रुवारी महिन्यात पोलिस आयुक्तालयात आलेल्या वाहनांची नोंदच नाही
सचिन वाझे हे तर महाविकास आघाडीला प्रिय होते
सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावरती पत्र लिहून आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याविषयी शंका उपस्थित करत आहे. मात्र हेच सचिन वाझे कालपर्यंत सरकारला प्रिय होते. अधिवेशनाचा एक मिनिटही बहुमूल्य असतो. मात्र याच सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्यासाठी अधिवेशन नऊ वेळा तहकूब करावे लागले , असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा-Antilia Explosive Scare : सचिन वाझेच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ
संघ काय दहशतवादी संघटना आहे का?
राज्याचे नवीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस दलातील संघाशी निगडित असणाऱ्या अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का ? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातली पूर परिस्थिती प्रत्येक वेळेस संघ मदतीला धावलेला आहे. त्यामुळे तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मध्ये घेऊ नका, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कटात मनसुख हिरनेचा सहभाग-
दरम्यान, अँटिलिया कार स्फोटक प्रकरणात आरोपी असलेल्या सचिन वाझेच्या कोठडी संदर्भात 7 एप्रिलला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली. मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया'बाहेर स्फोटकं ठेवण्याच्या कटात मनसुख हिरेनही सहभागी होता. त्यामुळेच त्याला आपला जीव गमवावा लागला, असा दावा एनआयएने बुधवारी विशेष कोर्टात केला. या संपूर्ण प्रकरणात काहीतरी मोठा आर्थिक उद्देश होता हे स्पष्ट आहे, मग तो काय होता? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे एनआयएने कोर्टात सांगितले. वाझेच्या कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.